
Shivsena UBT : राज्यात सत्तातंर होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आल्यापासून सातत्याने शिवसेना शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरेगावी गेले, की ते नाराज असल्याच्या बातम्या येतात. आता तर शिंदे गटाच्या आमदारांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून डावलण्याचे प्रकारही समोर येत आहेत. स्वतः एकनाथ शिंदे यांनाच आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळल्याने एकच खळबळ उडाली.
या पार्श्वभूमीवर शिंदे (Eknath Shinde) गटाच्या जखमेवर मीठ चोळण्याची संधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सोडतील तर नवलच. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सातत्याने शिंदे गटावर टीका करत असतात. सद्य राजकीय परिस्थिती आणि नव्या सरकारमध्ये शिंदे व त्यांच्या पक्षाची होत असलेली फरपट यावर अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. शिंदे गटाने आता डावलले जाण्याची सवय अंगवळणी करून घ्यावी, असा टोला दानवे यांनी लगावला आहे.
आपत्ती व्यवस्थापन समितीतून शिंदे गट बाद, उद्योग विभागाचे निर्णय - शिंदे गट बाद, रायगड जिल्हा नियोजन समिती बैठक - शिंदे गट बाद अशी उदाहरणं देत ही सुरुवात झाली आहे. शिंदे गटाने डावलले जाण्याची सवय अंगवळणी पाडून घ्यावी. तुमच्या योजनांवर फुल्या मारण्याचा सिलसीलाही सुरू झाला आहे, अशा शब्दात (Ambadas Danve) अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला डिवचले आहे.
राज्यात जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्याआधी झालेल्या खाते वाटपापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत. शिंदे यांचा दरेगाव दौरा, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम, बैठकांना दांडी यातून ते सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चांना पुष्टी मिळते. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र शिंदे यांचा चेहराच गंभीर असल्याचे सांगत आमच्यात कुठलेही वाद नाहीत किंवा शिंदे नाराज नाहीत, असे सांगण्याचा प्रयत्न करतात.
पण विधानसभा निवडणुकीआधी जे बाॅन्डिंग फडणवीस आणि शिंदे यांच्यात होते, ते आता मात्र दिसत नसल्याचे बोलले जाते. आपत्ती व्यवस्थापन समितीतून आपल्याला वगळण्यात आल्याची माहिती नाही. पण जिथे संकट, आपत्ती असते तिथे हा एकनाथ शिंदे असतोच, असे सांगत शिंदे यांनी हा विषय सहजपणे घेतला. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र तो गंभीरपणे घेत आता शिंदे यांना पुन्हा या समितीत घेण्याच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.