Chhatrapati Sambhajinagar : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचे चिरंजीव बिलाल यांच्या विवाह प्रित्यर्थ आयोजित स्वागत समारंभात हजेरी लावली. यावेळी योगायोगाने एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी तिथे उपस्थित होते. त्यामुळे खैरे यांनी ओवेसी यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांची गळाभेट घेतली. इम्तियाज जलील हे देखील त्यावेळी तिथे उपस्थित होते. या तीन विरोधकांच्या भेटीची सोशल मीडियावर दोन दिवसापासून चांगलीच चर्चा होत आहे.
चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि ओवेसी यांच्या गळाभेटीचा फोटो शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी आपल्या पेजवरून पोस्ट करत टोला लगावला आहे. असदोद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरोद्दीन ओवेसी यांनी काही वर्षांपूर्वी 'पंधरा मिनिट के लिए पोलीस हटा दो, फेर बता देंगे', अशी जाहीर धमकी प्रचार सभेतून दिली होती. याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले होते. याची आठवण करून देत राजेंद्र जंजाळ यांनी या भेटीच्या फोटोवर 'एक पंधरा मिनिट वाले तर दुसरे फुक वाले बाबा' असे म्हणत खैरे- ओवेसी यांच्यावर टीका केली. या भेटीवरून शिवसेना शिंदे गटाकडून राजकारण केले जात असल्याने याची चर्चा होऊ लागली आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि राजेंद्र जंजाळ हे पूर्वी एकाच पक्षात होते. चंद्रकांत खैरे हे जंजाळ यांच्यापेक्षा ज्येष्ठ आणि मोठा राजकीय अनुभव, दांडगा जनसंपर्क असणारे नेते आहेत. परंतु शिवसेनेत (Shivsena) फूट पडण्याआधीही चंद्रकांत खैरे आणि राजेंद्र जंजाळ यांच्यात वादाचे अनेक प्रसंग उद्भवले होते. खैरे यांनी आपले चिरंजीव ऋषिकेश खैरे यांना युवासेनेचे मोठे पद दिल्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी नाराजी व्यक्त करत खैरे पिता पुत्राविरूद्ध दंड थोपटले होते. अनेक छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमधून खैरे आणि जंजाळ यांच्यात खटके उडायचे. एकदा तर खैरे यांनी राजेंद्र जंजाळ यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली होती.
या धमकीला प्रति आव्हान देत राजेंद्र जंजाळ हे थेट बुलेटवर खैरे यांच्या निवासस्थानी जाऊन धडकले होते. 'माझे हातपाय तोडा' असे म्हणत ते तिथे ठाण मांडून बसले होते. त्यानंतर मात्र या दोघांमध्ये फारसा संवाद कधी दिसून आला नव्हता. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर राजेंद्र जंजाळ हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आणि त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. दुसरीकडे चंद्रकांत खैरे यांचा 2019 आणि 2024 अशा सलग दोन लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मधून पराभव झाला.
याशिवाय शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्याशी असलेल्या वादातून खैरे यांना अंतर्गत गटबाजीचाही सामना करावा लागत आहे. मातोश्रीवर खैरे यांचे वजन घटल्याचा आणि शहरातील पाणी प्रश्नासह रखडलेल्या विकासाला वीस वर्षे खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे हेच जबाबदार असल्याची टीका सातत्याने शिंदेंच्या शिवसेनेकडून केली जाते. आता ओवेसी यांच्या भेटीवरून शिंदेसेनेने पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांना टारगेट केल्याचे दिसून आले. तसं पाहिलं तर इम्तियाज जलील हे खैरे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.
परंतु राजकारणा पलीकडेही वैयक्तिक आणि मैत्रीपूर्ण संबंध सगळ्याच राजकीय पक्षातील नेत्यांचे असतात तसे ते खैरे यांच्याशीही इम्तियाज जलील यांनी ठेवले आहेत. त्यामुळे घरातील मंगल कार्याप्रसंगी कुठलीही आढी मनात न ठेवता इम्तियाज जलील यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते लोकप्रतिनिधींना स्वागत समारंभाचे निमंत्रण पाठवले होते. शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांनी या स्वागत समारंभाला हजेरी लावली होती. गळ्याच राजकीय पक्षांच्या स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकार्यांनी सोहळ्यात सहभागी होत इम्तियाज जलील व त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. अनेक विरोधक एकत्र आलेले असताना ओवेसी-खैरे यांच्या भेटीवरूनच शिवसेना शिंदे गटाने राजकारण सुरू केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.