

Shivsena News : छत्रपती संभाजीनगर शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजीला उधाण आले आहे. मुख्य नेते एकनाथ शिंदे एक वाद शमवत नाही, तोच दुसरा निर्माण होत असल्याने पक्षातील इतर पदाधिकारी, कार्यकर्ते बेचैन झाले आहेत. पालकमंत्री संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील तंटा शिंदे यांनी नागपूरच्या बैठकीत काही प्रमाणात सोडवला. तर आता आमदार प्रदीप जैस्वाल आणि त्यांचे जिगरी दोस्त असलेले छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे संपर्कप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्यात तानातानी सुरू झाली आहे.
शहरातील ज्या गुलमंडीवरून जैस्वाल-तनवाणी यांनी आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला त्याच प्रभागात आता मुलगा-भाऊ याला उमेदवारी मिळावी यासाठी दोघांमध्ये वादावादी सुरू झाली आहे. किशनचंद तनवाणी यांनी 2024 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर झालेली विधानसभेची उमेदवारी ऐनवेळी मागे घेत जैस्वाल यांचा मार्ग मोकळा करून दिला होता. 2014 मध्ये हिंदू मतांमध्ये झालेली फूट एमआयएमच्या पथ्यावर पडली होती. जैस्वाल-तनवाणी यांच्यातील टक्करमुळे इम्तियाज जलील यांची आमदार पदी लॉटरी लागली होती.
2024 मध्ये याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण त्याग केला आणि प्रदीप जैस्वाल यांना पाठिंबा जाहीर केला होता याची आठवण तनवाणी यांच्याकडून आता जैस्वालांना करून दिली जात आहे. या त्यागाच्या बदल्यात गुलमंडी या खुल्या प्रवर्गातून माझ्या मुलाला उमेदवारी मिळावी, अशी मागणी किशनचंद तनवाणी यांनी पक्षाकडे केली आहे. तनवाणी यांचे बंधू गुलमंडीतून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यामुळे हा प्रभाग मलाच मिळावा, असा त्यांचा आग्रह आहे.
तर दुसकीकडे प्रदीप जैस्वाल यांना आपला राजकीय वारस असलेल्या ऋषीकेश याला महापालिकेच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणायचे आहे. आता महापालिका आणि पुढच्या विधानसभेला मध्य मधून दावेदारी अशी जैस्वाल यांची रणनिती दिसते. त्यामुळे विद्यमान आमदार असलेल्या जैस्वाल यांनी तनवाणींचा त्याग वगैरे सब झुठ असल्याचे सांगत मी फक्त गुलमंडीवरून नाही तर संपूर्ण मध्य मतदारसंघातून निवडून आलेलो आहे, असे सांगत माघारीस स्पष्टपणे नकार दिला आहे.
महानगर पालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या आदेशानूसार वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यात मुख्य समन्वय समितीत आमदार प्रदीप जैस्वाल, ऋषीकेश या पिता-पुत्राचा समावेश आहे, पण यातून किशनचंद तनवाणी यांना दूर ठेवण्यात आले आहे. तर जंजाळ-शिरसाट यांच्यातील वाद मिटल्याचे चित्र असले तरी हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर शिरसाट या संपूर्ण प्रक्रियेत किती सक्रीय होतात? यावर बरेच अवलंबून असणार आहे.
तनवाणी यांनी गुलमंडी प्रभागावरून वाद वाढणार नाही, जैस्वाल अडून बसणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर जैस्वाल यावर तुर्तास बोलायला तयार नाहीत. शिवसेनेकडे महापालिका इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. साडेआठशेहून अधिक अर्ज दोन दिवसात गेले आहेत. आज सायंकाळपासून समर्थनगर येथील संपर्क कार्यालयात इच्छुकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या जाणार आहेत. जैस्वाल-तनवाणी यांच्यात मुलांच्या उमेदवारीसाठी एकाच प्रभागातून सुरू असलेल्या दाव्यावर एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय शिरसाट आणि समन्वय समिती कसा मार्ग काढते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.