Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या संभाजीनगर मध्य मतदारसंघांमध्ये आज खळबळ उडवून देणारी राजकीय घटना घडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेकडून विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तनवाणी यांना मैदानात उतरवले आहे.
या उमेदवारीमुळे हिंदू मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होऊन एमआयएम चा उमेदवार निवडून येईल. मतांचे विभाजन टाळण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे तनवाणी यांनी पत्रकारांना सांगितले. (Shivsena) तनवाणी यांच्या अचानक माघारी वरून उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेकडून तनवाणी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मध्य मतदारसंघातील इतर इच्छुकांनी थेट मातोश्री गाठत नाराजी व्यक्त केली होती. या नाराजांना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सर्व्हे करून निर्णय घेण्यात येईल असे, आश्वासन दिले होते.
मात्र त्यानंतर किशनचंद तनवाणी यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. तेव्हापासून शिवसेनेमध्ये अंतर्गत वादावादी सुरू असल्याची चर्चा होती. विधानसभा निवडणुकीत या अंतर्गत गटबाजी आणि नाराजीचा फटका आपल्याला बसू शकतो, याचा अंदाज तनवाणी यांना आल्यामुळे त्यांनी माघारीचा निर्णय घेत दबाव तंत्राचा वापर केल्याची चर्चाही या निमित्ताने होत आहे.
माघारीचा निर्णय सध्या तनवाणी यांनी वैयक्तिक पातळीवर घेतला असून आज सायंकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून माघारीची परवानगी द्या, अशी विनंती आपण करणार आहोत असेही तनवाणी यांनी पत्रकारांना सांगितले. (Chhatrapati Sambhajinagar) दरम्यान तनवाणी यांच्या मध्य मतदारसंघातील माघारीच्या निर्णयाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात एकच खळबळ उडाली आहे. उद्या (ता.29) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
त्याआधी उद्धव ठाकरे आणि तनवाणी यांच्या चर्चेत काय ठरते? यावर उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार निवडणूक रिंगणात असेल की माघार घेईल? हे स्पष्ट होणार आहे. 2014 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर किशनचंद तनवाणी यांनी शिवसेनेचे तेव्हाचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी घेतली होती.
या निवडणुकीत हिंदू मतांचे विभाजन होऊन एमआयएमचे इम्तियाज जलील हे विजयी झाले होते. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती एकत्रित लढली होती. तेव्हा किशनचंद तनवाणी यांनी आपले मित्र असलेल्या प्रदीप जयस्वाल यांच्यासाठी काम केले. त्याचवेळी 2024 च्या निवडणुकीत आपण माघार घेऊन तनवाणी यांना संधी देऊ, असा शब्द त्यांनी दिला होता असा दावा तनवाणी यांनी केला.
या आश्वासनाची आठवण आपण प्रदीप जयस्वाल यांना करून दिली व माघार घेण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोला, त्यांनी सांगितले तर मी माघार घेईन, असा पावित्रा घेत अप्रत्यक्षपणे माघारीस नकार दिला. त्यामुळे 2014 ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपणच माघारीचा निर्णय घेत आहोत, असे तनवाणी यांनी स्पष्ट केले. दरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच तनवाणी अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे तनवाणी यांना काय सांगतात? यावर मध्य मतदारसंघातील चित्र अवलंबून असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.