Shivsena-BJP News : जालन्यात महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युतीची बोलणी पुढे सरकत नसल्याने आमदार अर्जुन खोतकर यांनी शहर विकास आघाडीचा घाट घालण्यासाठी हालचाली सुरू केल्या. कालच दोन दिवसांचा अल्टीमेटम भाजप नेत्यांना त्यांनी दिला होता. दोन दिवसांचा अल्टीमेटम अन् शहर विकास आघाडीच्या हालचाली पाहता आता रावसाहेब दानवे मैदानात उतरले आहेत. युतीचा निर्णय दोन दिवसात होणार असे सांगत त्यांनी खोतकर यांना कानपिचक्याही दिल्या.
एक पत्र देऊन युती होत नसते, महाराष्ट्रात महापालिकेसाठी महिनाभराआधी कोणत्या पक्षाची युती किंवा आघाडी झाल्याचे एक उदाहरण मला दाखवा. युती होण्याआधीच महापौर पदाचा उमेदवार जाहीर करणे, दोन दिवसांचा अल्टीमेटम देणे हे योग्य नाही. आमच्या पक्षाची अंतर्गत बैठक, कोणत्या प्रभागात उमेदवार कोण असेल? त्याची निवडून येण्याची क्षमता, त्यासाठीची रणनिती, युतीत कोणते प्रभाग शिवसेना, रिपाइंला द्यायचे, यावर आधी आमची चर्चा झाली.
आता एक सविस्तर प्रस्ताव आजच आम्ही शिवसेनेकडे पाठवू, रिपाइंला पण आम्हाला सोबत घ्यावे लागणार आहे. त्यामुळे युतीचा निर्णय येत्या दोन दिवसात होईल, असे रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. भाजपच्या बैठकीनंतर रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलतांना शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांना कानपिचक्या देण्याची संधी सोडली नाही. जे मुद्दे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी उपस्थित केले होते, त्याची उजळणी रावसाहेब दानवे यांनीही केली.
महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), रिपाइं या पक्षासोबत युती करा, अशा राज्यातील नेत्यांच्या सूचना आहेत. अर्जुन खोतकर यांनी आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव पाठवला नव्हता, तर फक्त पत्र पाठवले होते. महिनाभर आधी पत्र पाठवून युती होत नसते, त्यासाठी परिपूर्ण असा प्रस्ताव एकमेकांकडे गेला पाहिजे. शिवाय महिना-दोन महिने आधी महापालिका निवडणुकीची बोलणी किंवा युतीचा निर्णय झाल्याचे राज्यात एकतरी उदाहरण मला दाखवा, असा टोलाही दानवे यांनी लगावला.
महापालिकेत युती- महायुती व्हावी अशीच आमची इच्छा आहे. त्या दृष्टीने आमची बोलणी आणि अंतर्गत तयारीही झाली आहे. आज आमचे महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांच्याकडून शिवसेनेला सविस्तर प्रस्ताव जाईल. त्यावर त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे आल्यानंतर एकत्र बसून दोन दिवसात युतीचा निर्णय जाहीर केला जाईल, याचा पुनरुच्चारही रावसाहेब दानवे यांनी केला.
युती संदर्भात भाजपचे (BJP) नेते गंभीर नाहीत, त्यांना युती करण्यात फारसा रस दिसत नाही. त्यामुळे आता थांबणे शक्य नाही, कार्यकर्त्यांना आता आम्हाला रोखता येणार नाही, असे सांगत अर्जुन खोतकर यांची शहर विकास आघाडीचा घाट घातल आहे. या आघाडीसाठी त्यांनी जोरदार तयारीही सुरू केली होती. आता रावसाहेब दानवे यांनी दोन दिवसांत युतीचा निर्णय होईल, असे सांगितल्यानंतर खोतकर काय भूमिका घेतात? हे पहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.