Marathwada Political News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील राजकारण आता चांगलेच तापायला लागले आहे. शिवसेना ठाकरे गटाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असतानाच अंबादास दानवे की चंद्रकांत खैरे ? असा पेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर निर्माण झाला आहे. (Shivsena Politcal News) तीन दिवसांपूर्वी 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांनी खैरेंच्या नावाला पसंती दिल्याची चर्चा आहे. तर दानवे मात्र ही माहिती खोटी असल्याचा दावा करतात.
निवडणुकीच्या तोडांवर खैरे-दानवे वाद चव्हाट्यावर येऊन पक्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी ठाकरे यांनी दोघांनाही कानमंत्र दिला आणि आता हे दोघे एकत्र दिसू लागले. (Shivsena) लोकसभा निवडणूक प्रचारासाठी अंबादास दानवे यांनी तयार केलेल्या अलिशान व्हॅनिटी व्हॅनच्या उद्घाटनाचा नारळ खैरे (Chandrakant Khaire) यांनी वाढवला. शिवाय व्हॅनिटीतल्या मुख्य सीटवरही बसण्याचा मानही खैरे यांना देण्यात आला. हे चित्र दोघांच्याही समर्थकांना सुखावणारे होते.
पण तिकडे शिंदेसेनेचे आमदार प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना मात्र दानवे-खैरेंचे पॅचप झाल्यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. दोघांपैकी एकाने माघार घेतली असल्याचा दावा करत खैरेंच्या हाताने दानवेंच्या व्हिनिटीचे उद्घाटन याला सहजतेने घेऊ नका, असा चिमटा शिरसाट यांनी काढला. व्हॅनिटी उद्घाटनाचा कार्यक्रम म्हणजे दोघांचे पॅचप झाले, असा लावत शिरसाट यांनी खैरे यांच्याऐवजी बहुदा लोकसभेसाठी अंबादास दानवे यांना आशीर्वाद मिळाल्याचे भाकित केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खैरेंच्या हस्ते दानवेंनी आपल्या व्हॅनिटीचे उद्घाटन केले ही साधी गोष्ट नाही. कदाचित 'मातोश्री'वरून खैरेंना आता तुम्ही थांबा, अन् अंबादास दानवेंना आशीर्वाद द्या, असे सांगितले असावे असेही शिरसाट म्हणाले. अंबादास दानवे यांची लोकसभेची जोरदार तयारी सुरू आहे, तर खैरे यांनी चारवेळा लोकसभेत या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्यांनी आता थांबावे, असे कदाचित सांगण्यात आले असावे. त्याशिवाय दानवे-खैरेंच्या हस्ते व्हॅनिटीचे उद्घाटन करणार नाही, असा दावाही शिरसाट यांनी केला.
ठाकरे गटाकडून लोकसभेची उमेदवारी कोणाला द्यायची, हा शेवटी उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे. दानवे की खैरे याचा फैसला महिनाभरात होईलच. पण छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून कोण लढणार? याचे उत्तर मात्र शिरसाट यांच्याकडे अजूनही नाही. ठाकरे गटाकडून कोणीही लढले तरी जनता ज्याला मतदान करेल तोच खासदार होईल. जनतेला ते ठरवू द्या, असे म्हणत शिरसाट यांनी दानवे-खैरेंच्या पॅचपवर भाष्य करतानाही दोघांमध्ये उमेदवारीवरून खटका कसा उडेल, असाच प्रयत्न केला आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.