

Chhatrapati Sambahajinagar News : महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे आघाडी होऊ शकली नाही. परिणामी दोन्ही पक्ष स्वबळावर लढले आणि तोंडावर आपटले. शंभर जागा लढवणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सहा जागा, तर नव्वद जागी उमेदवार देणाऱ्या काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. महापालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचे नेते जिल्हा परिषदेत आघाडी करण्यासाठी आतूर झाले आहेत.
या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची एक संयुक्त बैठक आज पार पडली. आघाडीची भूमिका, जागावाटप, प्रचाराची दिशा आणि समन्वय यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. अंबादास दानवे यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व स्थानिक नेते या बैठकीला उपस्थित होते. ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन रणनीती ठरवण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत एकत्रित ताकदीने लढण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीत वाट्याला आलेल्या अपयशातून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आता झेडपीमध्ये पुन्हा स्वबळावर लढण्याची चूक टाळण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरेंची ताकद जिल्ह्यात क्षीण झाली आहे. तर काँग्रेस पक्षाला या जिल्ह्यात एकही खासदार, आमदार गेल्या कित्येक वर्षात निवडून आणता आलेला नाही. गेल्या महापालिका निवडणुकीत दहा नगसेवक असलेल्या काँग्रेसची स्वबळावर लढण्याच्या हट्टामुळे यावेळी पाटी कोरी राहिली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत अस्तित्व टिकवण्याचा प्रश्न दोन्ही पक्षांसमोर आहे. नगरपालिका निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसने कन्नड आणि खुलताबाद येथे नगराध्यक्ष निवडून आणले. तर महाविकास आघाडीमुळे फुलंब्रीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रांजेद्र ठोंबरे यांना नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली. महापालिका निवडणुकीतील अपयश धुवून टाकायचे असेल तर जिल्हा परिषदेसाठी महाविकास आघाडी करून एकत्रित लढल्यास दोन्ही पक्षांना फायदा होऊ शकतो. ग्रामीण भागात शिवसेनेची संघटनात्मक ताकद काँग्रेसच्या तुलनेत अधिक आहे.
2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक 23 जागांसह भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. शिवसेनेचे 18, काँग्रेस-16, राष्ट्रवादी काँग्रेस-3 तर मनसे, डेमोक्रॅटिक पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला होता. दरम्यान, राज्यातील राजकारणात मोठी उलथा पालथ झाली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटले आहेत. मनसेची ताकद आता जिल्ह्यात राहिलेली नाही. तर काँग्रेससमोरही गेल्यावेळचे संख्या बळ राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.