

Mumbai News : राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीचे महापौर होणार आहेत तर काही ठिकाणी स्वबळावर लढत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे आतापर्यंतच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला राहिला होता. मात्र, भाजपसोबत महायुती न झालेल्या ठिकाणी शिंदे शिवसेनेची कामगिरी सुमार झाली आहे. त्याचा फटका काही ठिकाणी बसला आहे. या पूर्वी सत्तेत असलेल्या काही महापालिकेत शिवसेनेची कामगिरी सुमार राहिली आहे. त्यामुळेच आता एकनाथ शिंदे यांनी भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला असून अकार्यक्षम मंत्र्यांवर पूर्वीप्रमाणे पक्ष संघटनेची जबाबदारी दिली जाणार असल्याचे समजते.
मुंबई महापालिकेत महापालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जवळपास 60 माजी नगरसेवक होते. त्यापैकी 28 नगरसेवक निवडून आले आहेत. 90 जागा लढवत असलेल्या शिवसेनेला याठिकाणी मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे ठाणे महापालिकेत त्यांची सत्तास्थापन होईल एवढे संख्याबळ आले आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, कोल्हापूर या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला दमदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्याएवढे संख्याबळ त्यांच्याकडे नाही.
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड व कोल्हापूर या ठिकाणच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राइक रेट कमी राहिला आहे. त्यामुळे त्याठिकाणचा आढावा उपमुख्यमंत्री शिंदे लवकरच घेणार असून त्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. छत्रपती संभाजीनगर व शिवसेनेचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे भावनिक नाते आहे. त्याठिकाणच्या महापालिकेवर एकसंध शिवसेनेची आतापर्यंत सत्ता होती. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर त्याठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे खासदार व शहरात दोन आमदार निवडून आले आहेत. या ठिकाणी महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपसोबतची युती तुटल्यानंतर शिवसेनेला सत्तेत येण्यासाठी पोषक वातावरण होते. मात्र, याठिकाणी सेनेच्या वाट्याला मोठे अपयश आले आहे. त्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.
कोल्हापूर महापालिकेतही शिवसेनेला चांगली कामगिरी करण्याची संधी होती. त्याठिकाणी नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून चांगली कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. जालना महापालिका निवडणुकीत आमदार व अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या माध्यमातून सत्तेत येण्याची संधी होती मात्र फारशी दमदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे या मंडळींवर येत्या काळात टांगती तलवार असणार असून एकनाथ शिंदे या तिघांचा लाल दिवा काढून घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता पक्षातील मंत्री पदे नक्की कोणाला दिली जाणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षातील काही आमदारांच्या कामगिरीवर नाराज आहेत. त्यामुळे शिंदे हे भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांने दिली आहे.
शिंदे यांच्या पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देणार असेही सांगितले जात आहे. जे कार्यक्षम मंत्री आहेत त्यांच्यावर पक्षबांधणीची जबाबदारी सोपवली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात एकनाथ शिंदे नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देणार असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे नव्याने इच्छुक असलेल्या आमदार तयारीला लागले आहेत. येत्या काळात कोणत्या मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.