

Beed, 26 June : विलास घुले या तरुण हाॅटेल चालकाच्या खून प्रकरणाने बीड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा तापलं आहे. खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे याचा संबंध आणि सहभाग या हत्या प्रकरणात असल्याचा आरोप पीडिताचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून केला गेला. त्यानंतर आज एसआयटीचे पथक खासदार बजरंग सोनवणेंच्या 'पवनसूत' निवासस्थानी दाखल झाले आहे. खासदारपुत्र सौरभ सोनवणे याच्यावर असलेल्या आरोपांच्या अनुषंगाने चौकशीसाठी हे पथक धडकले आहे.
मृत विलास घुले यांचा भाऊ रमेश घुले याने दिलेल्या पुरवणी जबाबात खासदारपुत्र सौरभ बजरंग सोनवणे याचे नाव घेतले आहे. संशयित आरोपींना पळून जाण्यास सौरभने मदत केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आता जबाबात त्याचे नाव नोंदवले असून या बाबीचा तपास केला जात आहे. संशयित आरोपी ज्यावेळी विलास घुले याची हत्या करत होते, त्यावेळी ते सतत 'सौरभ बजरंग सोनवणे'चे नाव घेत होते. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सौरभच्या पाठबळामुळेच ही हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
नातेवाईक आणि आंदोलकांचा आरोप आहे की, सौरभ सोनवणे हाच या हत्येमागील सूत्रधार आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी 3 दिवस केजमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. तसेच, विलास घुलेचा मृतदेह 9 तास पोलिस ठाण्यासमोर ठेवण्यात आला होता.
आंदोलकांच्या मागणीनुसार या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा विशेष पथकामार्फत करावा, अशी मागणी होती. विधानसभेत आमदार धनंजय मुंडे यांनीही खरा सूत्रधार शोधा, पाळेमुळे खोदून काढा, तो लाडका आहे म्हणून त्याला पोलिस अटक करत नाहीत का? असा सवाल केला होता.
या सगळ्या पार्श्वभूमीवर एसआयटीने आज तपास सुरू केला आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या मुलावरील सगळे आरोप फेटाळले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मी आवाज उठवला म्हणून माझ्यावर राजकीय सूड उगवला जात आहे, असा आरोप सोनवणे यांनी केला आहे.
विलास घुले हत्या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही, एसपींनी तपास करावा आणि आरोपींना अटक करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. सौरभने आरोपींना पळून जाण्यास मदत केली का, तो 'मास्टर माईंड' आहे का? याचा तपास एसआयटी करत आहे. अद्याप सौरभवर गुन्हा दाखल झालेला नाही. पण, जबाबात त्याचे नाव नोंदवण्यात आले आहे.
मुंडे टाकळीत, पथक केजमध्ये..
दरम्यान, आज आमदार धनंजय मुंडे यांनी टाकळीत जाऊन मृत विलास घुले याच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना मुंडे यांनी बजरंग सोनवणे हे मुलाला वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणत आहेत. सगळ्या आरोपींना अटक केली. मग दहावा आरोपी अटक का होत नाही? तो कोणाचा लाडका आहे? असा प्रश्न करत मुंडे यांनी पोलिसांच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली. तसेच मुख्य सूत्रधाराला अटक होत नाही, तोपर्यंत विधीमंडळात आवाज उठवत राहू, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू, असा इशाराही मुंडे यांनी दिला.
इकडे मुंडेंनी टाकळीत पीडित कुटुंबाची भेट घेत खासदार सोनवणे व त्यांचे पुत्र सौरभ यांच्यावर आरोप केले, तर दुसरीकडे एसआयटीचे पथक केजमध्ये बजरंगबाप्पाच्या पवनसूत निवासस्थानवर धडकले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.