

Nanded Politics : दिवंगत नेते अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या धक्क्यातून अजूनही त्यांचे समर्थक,आमदार, लोकप्रतिनिधी सावरलेले नाहीत. प्रत्येक निवडणूक, जाहीर कार्यक्रमांमधून त्यांची आठवण काढली जातेच. कंधार विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भुमिपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. त्यांचा आजचा तिसरा नांदेड दौरा होता. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या भाषणात याचा आवर्जून उल्लेख केला.
प्रताप पाटील चिखलीकर हे भाषण करत असताना त्यांनी अचानक अजित पवारांचे नांदेड जिल्ह्यावर किती प्रेम होते? हे सांगताना बारामतीतील दुर्दैवी विमान अपघाताच्या दोन दिवस आधी दिवसभर ते नांदेडमध्ये आपल्यासोबतच होते याची आठवण सांगीतली. पंचवीस रोजी दादा दिवसभर नांदेडमध्ये होते, २६ ला परत गेले मंत्रीमंडळाची बैठक आटोपून २७ तारखेला बारामतीकडे निघाले आणि त्यांच्या विमान अपघाताची दुर्दैवी घटना कानावर आली.
हा प्रसंग सांगताना चिखलीकर यांना रडू आवरता आले नाही. काही मिनिटे स्तब्ध उभे राहत त्यांनी स्वतःला सारवरले आणि मग भाषणाला सुरूवात केली. या प्रसंगाने व्यासपीठावर उपस्थित सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व सगळेच नेते अजित पवारांच्या आठवणीने गहिवरले. अजित पवारांच्या अचानक जाण्याने आम्ही दुसऱ्यांदा पोरके झालो. विलासराव देशमुखांचे निधन झाल्यानंतर पोरके झाल्याची भावना निर्माण झाली होती. त्यानंतर तीच भावना अजित पवारांच्या अकाली निधनानंतर झाली.
सुनेत्रा पवार या आमच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राजकारण यायला तयार झाल्या. त्यांनी अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या सगळ्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आधार दिला आणि भक्कमपणे आणि दादांच्या धडाडीने कामाला सुरवात केली.
अजितदादांनी नांदेडला बोलावले तर कधी टाळले नाही, सुनेत्रा वहिनींनी देखील नांदेड जिल्ह्याला अंतर दिले नाही. आजचा हा त्यांचा तिसरा दौरा आहे, असे सांगतानाच चिखलीकर यांनी कंधार मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी आणि योजना देण्याची मागणी केली.
प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्यावर प्रत्येक निवडणुकीत नवा पक्ष आणि चिन्ह घेऊन लढावे लागले असे सांगीतले. अपक्ष, काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि आता राष्ट्रवादी पक्षाकडून मी आमदार आहे. नांदेडच्या जनतेने एकदा देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याची संधी दिली.
एकदा खासदार म्हणून निवडून आलो, दुसऱ्यांदा पराभूत झालो. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि पुन्हा आमदार झालो. आता कुठलाच पक्ष आणि चिन्ह शिल्लक राहिलले नाही, ज्यावर मी निवडणूक लढवली नाही, असा मिश्किल चिमटाही चिखलीकर यांनी आपल्या भाषणात काढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.