Sandipan Bhumre-Abdul Sattar
Sandipan Bhumre-Abdul SattarSarkarnama

सत्तारांनीच सांगितले, माझ्यात आणि भुमरेंमध्ये राजकीय संघर्ष...

जिल्हा बॅंकेची सत्ता नावाला शिवसेनेकडे असली तरी तिजोरीच्या चाव्या सत्तारांच्याच हातात असल्याने ते तिथे भुमरे-बागडे-काळे-दानवे यांची कोंडी करण्याची एकही संधी यापुढे सोडणार नाहीत. (Abdul Sattar)

औरंगाबाद : जिल्हा दुध उत्पादक संघाच्या निवडणूकीच्या निमित्ताने शिवसेनेतील दोन मंत्र्यांमध्ये असलेला राजकीय संघर्ष समोर आला. अडीच वर्षापुर्वी काॅंग्रेसमधून शिवसेनेत (Shivsena) दाखल झालेले आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये महसुल व ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि मुळचे शिवसेनेचे राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे (Marathwada) यांच्यात सध्या चांगलीच खडाजंगी सुरु आहे.

आधी काॅंग्रेसमध्ये आणि आता शिवसेनेत असलेले अब्दुल सत्तार यांच्या महत्वाकांक्षा कधी लपून राहिल्या नाही. मनासारखे झाले नाही, की बंड पुकारायचे आणि पक्ष श्रेष्ठीला दुषणे द्यायचे ही त्यांची जुनीच सवय. शिवसेनेत आल्यानंतरही त्यांची ही सवय काही मोडलेली नाही. मुळात कॅबिनेट मंत्री पदाचा शब्द घेऊन शिवसेनेत दाखल झालेल्या अब्दुल सत्तार यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले.

परंतु दुसरा पर्याय नसल्याने त्यांनी ते मुकाट्याने स्वीकारले आणि अडीच वर्ष आपल्या पद्धतीने कारभार सुरू केला. जिल्ह्यात संदीपान भुमरे कॅबिनेट, तर सत्तार राज्यमंत्री आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे नेतृत्व आपल्याकडे ठेवण्याचा दोघांचाही प्रयत्न, पण त्यात भुमरे आपला मतदारसंघ आणि आपले काम भले म्हणत नेतृत्वाच्या स्पर्धेत फारसे गुंतले नाही. जिल्हा बॅंक, जिल्हा परिषद, गावची ग्रामपंचायत, साखर कारखाना या विश्वात ते रमतात.

या उलट शिवसेनेत प्रवेश केल्यापासून अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यातील मुळ शिवसेनेच्या नेतृत्वाला न जुमानता आपला सवता सुभा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरूवातीपासूनच केले. अगदी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे आदेश डावल अध्यक्ष करण्याचा त्यांचा डाव ईश्वर चिठ्ठीमुळे उधळला गेला, अन्यथा जिल्ह्यातील नेत्यांना फाट्यावर मारत त्यांनी आपला स्वतंत्र अजेंडा राबवला होता.

शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीचा पुरेपूर फायदा उचलत सत्तार यांनी आपल्या खेळी यशस्वी केल्या. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना विरोध करण्यासाठी भुमरे-दानवे हे देखील सत्तारांना जाऊन मिळाले. जिल्हा बॅकेत या दोघांच्या मदतीनेच सत्तार यांनी बागडे सारख्या ज्येष्ठ नेत्याला बाहेरचा रस्ता दाखवला. नितीन पाटील यांना शिवसेनेत घेऊन अध्यक्षपदी बसवल्यावरही सत्तार यांचे समाधान झाले नाही.

शिवसेनेच्या डोणगांवकर यांना उपाध्यक्ष पद देण्याचे ठरले असतांना सत्तार यांनी भुमरे-दानवे यांना बाजूला सारत काॅंग्रेसमधील आपल्या जुन्या मित्राची साथ घेत उपाध्यक्षपदही आपल्या समर्थकाला मिळवून देत जिल्हा बॅंकेची सगळी सुत्रं आपल्या हाती घेतली. हाच प्रयोग सत्तार यांना जिल्हा दुध संघात देखील करायचा होता. पण गेली अनेक वर्ष अध्यक्ष असलेल्या आणि जिल्हा बॅंकेतील अनुभवातून शहाणे झालेल्या बागडे, भुमरे, काळे आणि अंबादास दानवे यांनी यावेळी ती चूक पु्न्हा नको म्हणत, सावध पावले उचलली.

Sandipan Bhumre-Abdul Sattar
स्वप्नातील घरे स्वप्नातच मिळणार ; पंतप्रधान `फेककुल` योजना, एमआयएमची पोस्टरबाजी

बागडेंच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर जिल्हा बॅंकेतील दगाबाजीचे उत्तर सत्तारांना देण्याचा निर्णय झाला आणि सत्तार समर्थकाचा पराभव झाला. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत जो खेळ सत्तारांनी या चौघांना सोबत घेऊन केला होता, तोच खेळ या चौघांनी सत्तार यांच्यावर उलटवला. या खेळीमागे मंत्री संदीपान भुमरे हेच असल्याचे सत्तार यांनी ओळखले आणि मग धमकी, इशाऱ्यांचा सिलसिला सुरू झाला.

परिणाम भोगावे लागतील, हर्सुलला पाठवीन, चौकशी लावतो अशी भाषा सत्तारांनी सुरू केली, एवढेच नाही तर आपल्यात आणि भुमरेंमध्ये राजकीय संघर्ष सुरू असल्याचे जाहीररित्या सांगूनही टाकले. एकंदरित जिल्हा दूध संघात आपला उपाध्यक्ष बसवता आला नाही, याची प्रचंड चीड सत्तार यांच्या कालच्या विधानांमधून दिसून आली.

जिल्हा बॅंकेची सत्ता नावाला शिवसेनेकडे असली तरी तिजोरीच्या चाव्या सत्तारांच्याच हातात असल्याने ते तिथे भुमरे-बागडे-काळे-दानवे यांची कोंडी करण्याची एकही संधी यापुढे सोडणार नाहीत, एवढे मात्र निश्चित. या शिवाय भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात सत्तार आता अधिक लुडबूड करून त्यांना त्रास देतील, अशी देखील चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com