

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 100 जागा लढवून 6 नगरसेवक निवडून आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खैरे विरुद्ध दानवे संघर्ष नव्याने उफाळून आला. अंबादास दानवेंचा विषय आता संपला आहे, जिल्हा परिषद निवडणुकीचे नेतृत्व मी माझ्याकडेच घेणार असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ठणकावून सांगितले होते. तर अंबादास दानवे यांनीही मी खैरेंच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. पण उद्धव ठाकरे यांनी मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी अंबादास दानवे यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
जिल्हा परिषदेसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगरची जबाबदारी अंबादास दानवे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर नेतृत्व स्वत:कडे घेण्यास इच्छुक असलेल्या चंद्रकांत खैरे यांच्याकडे लातूर आणि बीड जिल्हा परिषदेची जबाबदारी देण्यात आली आहे. संघटनात्मक रचनेत खैरे यांच्याकडे पूर्वीपासून हे दोन जिल्हे आहेत. पैकी लातूर जिल्हा परिषदेची निवडणूक ही पहिल्या टप्प्यात तर दुसर्या टप्प्यात बीडची होणार आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत पक्षाच्या वाट्याला लाजिरवाणा पराभव आला याबद्दल दु:ख वाटत असल्याची प्रतिक्रिया खैरे यांनी दिली होती.
अंबादास दानवे महापालिकेच्या मतदानाआधी चार दिवस गायब होता, तो कुठे होता? कोणालाच माहित नव्हते. आम्ही फोन लावले तरी तो सापडत नव्हता? त्याला त्याच्या भवितव्याबद्दल काही तरी विचार करायचा असेल, असे म्हणत अंबादास दानवे यांच्यावर आरोप केले होते. महापालिकेत पक्षाला अपयश आले आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेला मी नेतृत्व स्वतःकडे घेणार असल्याचे खैरे म्हणाले होते. परंतू पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून आज जाहीर करण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांनूसार खैरे यांच्याकडे बीड, लातूर जिल्हा परिषदेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तर छत्रपती संभाजीनगर-जालना जिल्हा परिषदेसाठी नेमण्यात आलेल्या समितीचे नेतृत्व हे अंबादास दानवे यांच्याकडे असणार आहे. या समितीमध्ये उपनेते सचिन घायाळ, सुभाष पाटील, माजी आमदार उदयसिंग राजपूत, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेप्रमाणेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतही खैरे यांना हस्तक्षेप करता येणार नाही हे स्पष्ट झाले आहे. एकप्रकारे चंद्रकांत खैरे यांना जिल्ह्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा पुन्हा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महापालिका निवडणुकीच शिवसेनेला संभाजीनगरमध्ये यश मिळाले नसले तरी याची कारणे शोधायला आणि संघटनात्मक फेरबदल करायला बराच कालावधी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतांना कुठलाच पक्ष संघटनात्मक फेरबदल करण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी जरी नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतरच पक्ष पातळीवर चर्चा केली जाऊ शकते. तूर्तास खैरे यांना जिल्ह्याबाहेरच नेतृत्व करावे लागणार हे आता स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.