Mumbai News : देशाच्या संरक्षणासाठी सैन्यात सेवा बजावणाऱ्या अग्निवीरांच्या भवितव्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशासाठी चार वर्षे कठोर प्रशिक्षण घेऊन सीमांचे रक्षण करणाऱ्या युवकांना सेवेनंतर बेरोजगारीच्या गर्तेत ढकलणे अन्यायकारक आहे. शिस्त, धैर्य, नेतृत्व आणि संकट व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले हे युवक राज्यासाठी मोठी संपत्ती आहेत.
त्यांच्या कौशल्याचा उपयोग शासनाने विविध क्षेत्रांत करून घ्यायला हवा. देशसेवा केल्यानंतर या अग्निवीर जवानांना वाऱ्यावर सोडू नका, सरकारने त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशीव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली.
महाराष्ट्रातील अग्निवीरांची पहिली तुकडी नोव्हेंबर 2026 मध्ये सेवामुक्त होणार असून, त्यापैकी केवळ 25 टक्के जवानांनाच उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे पुन्हा सेवेत संधी मिळणार आहे. उर्वरित 75 टक्के प्रशिक्षित जवानांना सेवामुक्त केले जाणार आहे. इतर अनेक राज्यांनी सेवामुक्त अग्निवीरांसाठी शासकीय सेवांमध्ये 20 टक्के समांतर आरक्षण लागू केले आहे.
त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही तातडीने निर्णय घेऊन अग्निवीरांना शासकीय नोकऱ्यांमध्ये प्राधान्य, विविध विभागांमध्ये समांतर आरक्षण, विशेष भरती प्रक्रिया, कौशल्याधारित रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य तसेच पुनर्वसनासाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक धोरण जाहीर करावे, अशी मागणीही कैलास पाटील यांनी केली.
देशासाठी आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे समर्पित करणाऱ्या जवानांना सेवामुक्तीनंतर असुरक्षिततेच्या गर्तेत ढकलणे योग्य नाही. त्यांच्यासाठी केवळ गौरवाचे शब्द नव्हे, तर रोजगाराची आणि सुरक्षित भविष्याची हमी देणे ही सरकारची नैतिक जबाबदारी असल्याचेही कैलास पाटील यांनी सभागृहात मांडले.
मराठवाड्याला आश्वासनांची नव्हे, तर विकासाची गरज आहे. वाढता अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज, उद्योगांसाठी प्रोत्साहन, सिंचन प्रकल्पांना गती आणि रखडलेल्या योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी. मराठवाड्यातील जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. सरकारने सर्वसमावेशक आणि न्याय्य विकासासाठी तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अशी मागणीही पाटील यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.