Shivsena UBT : संभाजीनगरात ठाकरे गटाला लागलेली गळती नेते गांभीर्याने घेणार का?

Chhatrapati Sambhajinagar Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला.
Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Ambadas Danve
Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Ambadas DanveSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News, 29 June : राज्यात शिवसेना (Shivsena) पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडाला गेल्या चाळीस वर्षापासून पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मोठी साथ मिळाली होती. शहरातील पश्चिम, मध्य आणि ग्रामीमधील वैजापूर, सिल्लोड, पैठण अशा पाच विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले होते. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का होता.

परंतु मंत्री, आमदार आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार पदाधिकारी सोडले तर सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. गेल्यावेळी साडेचार हजार मतांनी पराभूत झालेले खैरे यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून महायुतीचे संदीपान भुमरे यांना मराठा समाजाचे एकगठ्ठा मतदान झाले. याचा फटका खैरे यांना बसला आणि 2 लाख 93 हजार मतांसह ते तिसऱ्या क्रमाकांवर राहिले. या निवडणुकीत सामान्य शिवसैनिक ठाकरे गटासोबतच होता. महिला आघाडीची भूमिकाही या निवडणुकीत महत्वाची होती. परंतु मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाल्याचा फटका ठाकरे गटाला बसला.

सलग दोनवेळा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ठाकरे गटात काहीशी उदासिनता पसरल्याचे चित्र आहे. यात निवडणुकीतील पराभवापेक्षा जिल्ह्यातील नेत्यांचे कार्यकर्ते, महिला आघाडीकडे होत असलेले दुर्लक्ष हे प्रमुख कारण आणि आगामी जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत आपल्याला संधी मिळेल की नाही? याबद्दलची धाकधूक असल्याचे बोलले जात आहे. पक्षात मोठ्या प्रमाणावर फूट पडल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोन नेत्यांमधील ताणले गेलेले संबंध काही सुरळीत झाले नाही.

Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Ambadas Danve
Uddhav Thackeray : विदर्भात राजकीय घडामोडींना वेग, ठाकरे गटाच्या इच्छुकांचा पत्ता कट;'आमदारकी'चा मार्ग खडतर ?

अगदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दोघांना मातोश्रीवर बोलावून लोकसभा निवडणुकीच्या आधी दिलेली समजही वाया गेली. उमेदवारी मिळवण्यापासून ते निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची सत्र सुरूच होते. नेत्यांमध्येच भांडण असल्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर होतोच. लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांचा संभाजीनगर दौरा झाला तेव्हा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली धूसफूस समोर आली होती.

उद्धव ठाकरे यांच्याभोवती घोळका घालून असलेले नेते आम्हाला उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचू देत नाही, त्यांना भेटू देत नाही, असा सूर काढत महिला आघाडीने ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्येच गोंधळ घातला होता. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासमोर हा प्रकार घडला होता. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्याबद्दल स्थानिक नेत्यांनी महिला पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती.

Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Ambadas Danve
Thackeray Vs Shinde: ठाकरेंना भेटलोच नाही म्हणत शिंदेंच्या माजी आमदाराने दिलं 'हे' आव्हान

पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कधीच मुंबईहून आलेल्या वरिष्ठ नेत्यांना भेटू दिले जात नाही. केवळ निवडणूक काळात प्रचारासाठी आमचा वापर केला जातो, अशी मनातील खदखद तेव्हा महिला आघाडीने बोलून दाखवली होती. पण नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे उद्धव ठाकरे आणि स्थानिक नेत्यांनीही दुर्लक्ष केले.

त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. आडवाडाभरापूर्वी शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांच्या समर्थक प्रतिभा जगताप, माजी नगरसेवक गजानन मनगटे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला.

त्यानंतर काल चंद्रकांत खैरे यांच्यामुळे संभाजीनगरचे महापौर पद मिळालेल्या माजी महापौर कला ओझा आणि अन्य एक महिला पदाधिकारी शिंदे गटात गेल्या. एकीकडे पक्षाचे वरिष्ठ नेते दखल घेत नाहीत, स्थानिक नेते किंमत देत नाही तर दुसरीकडे पक्ष प्रवेशासाठी पायघड्या आणि पद देऊन सन्मान केला जातोय. महिला आघाडीने ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत नवी वाट धरली आहे. पण अजूनही ठाकरे गटाचे नेते याकडे गांभीर्याने पहायला तयार नाहीत.

पक्षाला लागलेल्या गळतीला भगदाडाचे स्वरुप येण्याआधी खैरे-दानवे यांनी पावले उचलणे गरजेची आहेत. प्रतिभा जगताप, गजानन मनगटे यांनी पक्ष सोडल्यानंतर अंबादास दानवे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात महिला आघाडीची बैठक घेऊन त्यांच्याकडून एकनिष्ठ राहण्याची ग्वाही घेतली होती. त्यानंतरही माजी महापौर व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट धरली.

त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीवर वरवरची मलमपट्टी करून भागणार नाही, तर यावर योग्य उपचार करावे लागणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम असणारा आणि अनेक वर्ष बालेकिल्ला राहिलेला हा गड ढासळतो आहे. तो भूईसपाट होण्याआधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व स्थानिक नेत्यांनी यात लक्ष घालावे ही अपेक्षा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com