युवराज धोतरे
Latur District Politics News : विधानसभा निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तशा राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. लातूर जिल्ह्यातील आरक्षित असलेल्या उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले संजय बनसोडे यांना घेरण्यासाठी महाविकास आघाडीसह महायुतीतील काही इच्छुक कामाला लागले आहेत. भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी काही महिन्यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत बनसोडे यांच्याविरोधात लढण्याची तयारी सुरू केली आहे.
उमेदवारी देण्याच्या शब्दावरच त्यांचा प्रवेश झाल्याचा दावा समर्थकांकडून केला जातोय. बनसोडे यांना धोबीपछाड देण्यासाठी शरद पवारांनी (Sharad Pawar) टाकलेला डाव यशस्वी होतो का? याची उत्सूकता सगळ्यांना लागली आहे. उदगीरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होऊ शकतो. या शिवाय महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपचे लातूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले माजी खासदार सुधाकर शृंगारे हे ही विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यास इच्छुक आहेत.
भाजपकडून उमेदवारी मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र युतीमध्ये ही जागा अजित पवारांकडे जाण्याचीच अधिक शक्यता असल्याने शृंगारे यांनी बी प्लान तयार ठेवत प्रसंगी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांना सहानुभूती मिळेल ? अशी अपेक्षा त्यांचे समर्थक बाळगून आहेत. बनसोडे यांनी आपल्याला मिळालेल्या मंत्री पदाचा उपयोग उदगीर मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी करून घेतला, तसेच कोट्यावधींचा निधी आणला, असा दावा केला जातोय.
या जोरावरच ते उदगीरमध्ये विरोधकांना धूळ चारतील, असे बोलले जाते. दुसरीकडे काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष उषाताई कांबळे, बाजार समितीचे संचालक मधुकर एकुर्केकर यांचीही चाचपणी सुरू आहे. (Latur) जिल्ह्यात लातूर शहर आणि ग्रामीण या दोन मतदारसंघासाठी तडजोडीचे राजकारण केले जाते, असा आरोप नेहमीच केला जातो. या निवडणुकीतही अशा तडजोडी केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यानूसार निलंगा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडायचा व उदगीर काँग्रेसकडे घ्यायचा, असा विचार महाविकास आघाडीमध्ये सुरू असल्याची चर्चा आहे. असे जर झाले तर काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी, अशी लढत मतदारसंघात पहायला मिळू शकते. गेल्या पाच वर्षात लातूरपेक्षा उदगीर मतदार संघात अधिक विकास कामे झाल्याचा दावा करत लातूरकर लोकप्रतिनिधींना जाब विचारत आहेत.
शिवाय जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपद उदगीरला मिळाल्याने लातूरकरांमध्ये नाराजीचा सूर आहे. यातून संजय बनसोडे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची रणनिती महाविकास आघाडीकडून आखली जात आहे. आता नेमका करेक्ट कार्यक्रम कोणाचा होणार? हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.