

Vilas Ghule Murder Case: शनिवारी (२० जून) बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या टाकळी येथे विलास घुले या हाॅटेल चालकाची एका टोळक्याने चाकूने हल्ला करत हत्या केली होती. हाॅटेलमध्ये झालेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या हत्या प्रकरणानंतर आरोपींना पळून जाण्यास मदत व आपली गाडी दिल्याचा आरोप असलेला खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी घुले कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला होता.
विलास घुले यांचा मृतदेह ताब्यात न घेता तो केज पोलीस स्टेशनसमोर आणून ठेवत गेल्या तीन दिवसापासून पाच ते सहा वेळा रास्तारोको आंदोलन करण्यात आले. पोलीस अधीक्षक नवनीत कुमार काँवत यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालत केजमध्ये येऊन परिस्थिती हाताळली. पुराव्याशिवाय कारवाई करता येणार नाही अशी भूमिका काँवत यांनी सौरभ सोनवणे याच्या बाबतीत घेतली होती. परंतु विधीमंडळ अधिवेशनात मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण लावून धरले. आरोपी व त्यांना साथ देण्याचा आरोप असलेल्या खासदार पुत्र बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव एफआयआरमध्ये घेण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोबाईलवरून केजमधील आंदोलकांशी संवाद साधून आरोपींना कठोर शिक्षा आणि जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाईचा शब्द दिला. पोलीसांनी वेगवान तपास करत सगळ्या आरोपींना अटक केली. मात्र सौरभ सोनवणे याचे नाव पुरवणी जबाबात घ्या, असा आग्रह आंदोलकांचा होता. अखेर पोलीसांनी पुरवणी जबाबात सौरभ सोनवणे याचे नाव घेतले आहे. पुराव्याच्या आधारे सर्व प्रकारची कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आंदोलकांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
विलास घुले याच्या हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेला जातीय रंग दिला जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे यांचीही चौकशी करा, जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करा, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. माझ्या मुलाच्या विरोधात पुरावे सापडले तर निश्चित कारवाई करा, सरकार, पोलीस तुमचे आहेत, असे म्हणत खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणात राजकारण आणले जात असल्याचा आरोप केला होता.
विलास घुले हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. या सर्व आरोपींना विविध ठिकाणाहून बीड पोलिसांच्या विशेष पथकांनी ताब्यात घेत अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. आंदोलकांच्या मागणी आणि आक्रमक पावित्र्यांनतर पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे याचे नाव घेतले असून याचाही तपास केला जाणार आहे. केज तालुक्यात २० जूनच्या रात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेत हत्येचा कट रचून विलास घुले याच्यावर हल्ला झाल्याचा आरोप आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.