Marathwada News : महाराष्ट्रात शिक्षणासाठी जसा लातूर पॅटर्न प्रसिद्ध आहे, तसेच सांगलीहून रेल्वेने लातूरला पाणी आणल्यामुळे काही वर्षापुर्वी याची राज्यभरात चर्चा झाली होती. लातूरने देशाला केंद्रीय मंत्री, राज्याला मुख्यमंत्री दिले, पण त्यांनाही लातूरचा पाणी प्रश्न कायमचा सोडवता आला नाही. उजनीच्या पाण्याचे आताच्या राजकारण्यांकडून कायम गाजर दाखवले जाते. याच पाण्याच्या राजकारणावर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, पुढारी आपली पोळी भाजून घेत आहेत. लातूरकर मात्र पाण्याची वाट पाहतच राहतात.
लातूर (Latur) शहराला 35 वर्षांपूर्वी मांजरा नदीद्वारे पाणीपुरवठा होत होता, तेव्हा शहराला दररोज पाणी मिळत होते. पण, त्यानंतर मात्र शहर वाढत गेले आणि पाणी पुरवठ्याचे नियोजन ढासळले. मांजरा धरण शंभर टक्के भरले, तरी लातूर शहराला कधी आठ दिवस, तर कधी दहा दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जातो. गेल्या दहा वर्षांत तर लातूरचे राजकारण पाण्याभोवतीच फिरत आहे. एकही निवडणूक जात नाही, ज्यात पाण्याचा विषय निघत नाही किंवा ते पुरवण्याचे आश्वासन नेते देत नाहीत.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते स्थानिक नेत्यापर्यंत लातूरकरांना उजनीच्या पाण्याचे गाजर दाखविण्याचेच काम झाले आहे. परंतु नेत्यांनी वेळीच लक्ष न दिल्यामुळे आज लातूरकरांवर पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे. शहराला मांजरा धरणातून नदीपात्रात पाणी सोडून साई व नागझरी येथून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा (Water Issue) केला जात होता. साई योजना तर निजामकालीन योजना होती. त्यावेळी शहराला दररोज पाणीपुरवठा होत होता. पण नंतर शहरासाठी पाणीपुरवठा योजना टप्पा पाच ही योजना कार्यान्वित झाली.
धरणातून सरळ पाइपलाइनद्वारे शहराला पाणीपुरवठा होऊ लागला. पण, गेल्या तीस-पस्तीस वर्षांत शहर वाढले, लोकसंख्या वाढली; पण त्या दृष्टीने पाणी पुरवठ्याच्या सुविधा निर्माण झाल्या नाहीत. त्याच्या झळा आजही लातूरकरांना सोसाव्या लागत आहेत. आठ-दहा वर्षांपासून लातूरचे राजकारण पाण्याभोवती फिरत आहे. त्यात 2016 च्या दुष्काळात, तर रेल्वेने पाणीपुरवठा झाला. यात लातूरला पाणीपुरवठा कमी, पण बदनामीच अधिक झाली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरला मंत्रिमंडळ आणून बैठक घेतली. लातूरसाठी उजनी किंवा माजलगाव धरणातून पाणी आणले जाईल, अशी घोषणा केली.
फिजिब्लिटी तपासण्याच्या सूचना दिल्या. आजही त्या सूचना लालफितीतच अडकल्या आहेत. त्यानंतर सातत्याने उजनीचे पाणी चर्चेचा विषय राहिला. माजी मंत्री अमित देशमुख असोत किंवा माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर असोत, या तरुण नेत्यांनी निवडणुकांत उजनीचे पाणी आणण्याच्या घोषणा केल्या; पण त्या हवेतच विरल्या. पाण्याची आणीबाणी मात्र कायम राहिली.
विलासरावांनी योजना आणली, पण महापालिका फेल
जिल्ह्याचे नेतृत्व विलासराव देशमुख यांच्याकडे होते तेव्हा त्यांनी जिल्ह्यासाठी अनेक योजना आणल्या. राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री राहिलेल्या विलासरावांनी लातूरकरांना पाणी मिळावे, म्हणून शहर पाणीपुरवठा योजना टप्पा पाचला निधी देत ती पूर्ण करून घेतली. त्यानंतर मांजरा धरणाची उंची वाढवली. इतकेच नव्हे तर लातूरला पाणी मिळावे, म्हणून मांजरा नदीच्या पात्रात 125 किलोमीटर अंतरात बारा उच्च पातळीवरचे बंधारे बांधले. त्यामुळे दरवर्षी 125 किलोमीटरच्या नदीपात्रात पाणी थांबून राहात आहे. पण, या पाण्याचा लातूरसाठी उपयोग करून घेण्यात महापालिकेचे प्रशासन मात्र अपयशी ठरले आहे.
जिल्ह्यातील दुसरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर लातूरचे नगराध्यक्षही होते. सातवेळा खासदार, लोकसभेचे अध्यक्ष आणि केंद्रात त्यांनी मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. सुरवातीच्या काळात धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या शब्दाला किंमतही होती. पण, पुढच्या काळात मात्र लातूरचे प्रश्न सोडविण्यासाठी मी नाही, असेच ते निवडणुकांतून सांगत राहिले. लातूरच्या पाणीप्रश्नावर ते कधी बोलले नाहीत किंवा तो प्रश्न सोडविण्यावर त्यांनी कधी भरही दिला नाही.
2016 मध्ये लातूरला भीषण टंचाईचा सामना करावा लागला. तेव्हा राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीचे सरकार होते. त्यावेळी रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा करावा लागला. त्यावेळी फडणवीस यांनी लातूरचा दौरा केला, अख्खे मंत्रिमंडळ येथे आणले. येथील विश्रामगृहात बैठक घेऊन लातूरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविला जाईल, अशी घोषणा केली. याकरिता उजनी व माजलगाव धरणांतून पाणी आणले जाईल, असे सांगितले. याची फिजिब्लिटी तपासा अशा सूचना त्यांनी दिल्या. पण, नऊ-दहा वर्षांनंतरही या सूचना लालफितीतच अडकलेल्या आहेत. ना उजनीचे पाणी आले ना माजलगावचे त्यामुळे लातूरकरांच्या पदरी पुन्हा निराशाच आली.
अमित देशमुखांकडूनही निराशा..
दरम्यान, लातूर शहर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार अमित देशमुख हे 2009 पासून करीत आहेत. काँग्रेस आघाडी आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. विधानसभा किंवा महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी उजनीचे पाणी आणण्याच्या घोषणा केल्या. पण, पुढे काहीच होऊ शकले नाही. महापालिकेवर त्यांची पहिल्यापासूनच सत्ता राहिली आहे. पण लातूरचा पाणी प्रश्न त्यांनाही सोडवता आला नाही.
निलंगेकरांचे आश्वासन हवेतच..
निलंग्याचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली 2017 मध्ये महापालिलकेची निवडणूक लढली गेली. महापालिका आणि जिल्हा परिषदेत पक्षाला झिरो ते हिरो करण्याचे श्रेय निलंगेकर यांना जाते. काँग्रेसच्या ताब्यातून महापालिका खेचण्यात निलंगेकर यांचा मोठा वाटा होता. तेव्हाही त्यांनी उजनीचे पाणी आणू, अशी ग्वाही लातूरकरांना दिली होती. पण, उजनीचे पाणी तर आले नाही पण त्यांच्या सत्तेच्या काळात देखील शहरातील पाणीपुरवठ्याचे बारा वाजले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.