

Harshwardhan Sapkal : राज्यातील फोडाफोडीचे राजकारण नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीनंतर महापालिकेतही सुरू आहे. काँग्रेस पक्षाने ज्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली, त्यांनाच भाजपने पक्षात प्रवेश दिल्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कमालीचे संतापले आहेत. जालन्यात त्यांनी भाजपवर राग व्यक्त करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 'तुम्ही देवाभाऊ नाही तर, घेवाभाऊ आहात' अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवाभाऊ नसून घेवाभाऊ आहेत. ते दुसऱ्या पक्षातील नेते फोडतात, त्यांना भाजपमध्ये घेतात, अवैध व्यवसायातून, भूमाफियाकडून, शासकीय निधीतून गैरव्यवहार, भ्रष्टाचार करणारे आज सगळे लोक त्यांच्या पक्षात आहेत. पण ते गजनी असल्यामुळे त्यांना विसरण्याचा आजार झाला आहे, अशी टीकाही हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जालन्यात पत्रकारांशी संवाद साधला.
भाजप आणि निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रियेला काळीमा फासत आहे. भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाने लोकशाहीला गुंडाळून ठेवले आहे. निवडणुकीत ऐनवेळी माघार घेणे किंवा बिनविरोध निवडणूक करणे हे लोकशाहीला मारक आहे. सत्ताधारी पक्षाकडून निवडणुकीत पैसा आणि गुंडागर्दीचा वापर वाढला. या बाबीला जनतेने गांभीर्याने घ्यावे, अन्यथा देशात अराजकता निर्माण होईल, असा इशारा सपकाळ यांनी यावेळी दिला.
श्रीलंका, बांगलादेशात जे झाले ते देशात होऊ नये म्हणून चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान भारत काँग्रेसमुक्त नव्हे तर भाजप काँग्रेसयुक्त झाले आहे. कारण अंबरनाथमधून आम्ही ज्यांना काँग्रेसमधून बडतर्फ केले, भाजपने त्यांनाच पक्षात घेतले आहे. भाजपला सर्वांचे विचार पुसून टाकायचे आहेत. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात सध्या नुरा कुस्ती सुरू आहे. अजित पवार यांनी आधी सत्तेतून बाहेर पडावे. मगच भाजपवर टीका करावी.
समृद्धी महामार्गात दोन हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सपकाळ यांनी यावेळी केला. या घोटाळ्यातूनच पन्नास खोके एकदम ओकेचा नारा आला आहे, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावरही टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.