Political News : आजवर धाराशिव जिल्ह्यात झालेल्या 17 लोकसभा निवडणुकांपैकी तब्बल 11 निवडणुकांमध्ये काँग्रेसने विजय मिळविलेला आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा कायम वरचष्मा राहिलेला आहे. मतदारसंघ खुला असो की आरक्षित काँग्रेसचा विजय पक्का असे एकेकाळी चित्र होते. परंतु नंतर या यशाला अशी काही घसरण लागली की काँग्रेस त्यातून सावरूच शकली नाही.
आघाडीच्या राजकारणात मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला आणि काँग्रेस मतदारसंघातून हळूहळू कुमकूवत होऊ लागली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यामुळे खेड्यापाड्यात शिवसेना वाढू लागली. त्याला मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार चळवळीचीही पार्श्वभूमी होती. जिल्ह्यातून काँग्रेस संघटनात्मक पातळीवर शक्तीहीन झाली.
आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला अद्याप सूर गवसलेला नाही. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जाणार असल्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्येही फारसा उत्साह दिसून येत नाही.
धाराशिव म्हणजे यापूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव पुसून टाकण्यात काँग्रेसला यश आले. जिल्ह्यातील शेकापच्या भाई उद्धवराव पाटील यांच्यानंतर या पक्षाची पकड सैल झाली आणि काँग्रेसने बाळसे धरायला सुरुवात केली. काँग्रेस वरचढ होत गेली, लोकसभा निवडणुकीतही त्याचा चांगलाच प्रभाव जाणवू लागला होता. शेकापचे त्यावेळचे मातब्बर नेते भाई नरसिंहराव देशमुख, भाई उद्धवराव पाटील या दोन्ही दिग्गज नेत्यांना काँग्रेसने लोकसभेच्या मैदानात पराभूत केले होते.
सलग अकरा लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने उस्मानाबाद जिल्ह्यात आपल्या विजयाचा झेंडा कायम फडकवत ठेवला. नंतर आघाडीच्या राजकारणात मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःकडे घेतला. 1999 पासून पुढील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने आपला जोर दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार चळवळीमुळे शिवसेना संघटनात्मक पातळीवर गावोगावी वाढली. नामांतर चळवळीला विरोध म्हणून शिवसैनिक एकवटू लागले आणि शिवसेना संघटनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत होत गेली.
लोकसभा निवडणुकीतही त्याचे आपोआप चित्र उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर दोन हात करताना दमछाक होऊ लागली. शिवसेनेने लोकसभेत धाराशिव मतदारसंघातून पहिल्यांदा भगवा झेंडा फडकवत विजय मिळवला. तेव्हापासून शिवसेनेच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचा आलेख कायम आहे. 2009 साली डॉ. पद्मसिंह पाटील यांनी प्रा. रवींद्र गायकवाड यांचा केलेला पराभव हा एकमेव अपवाद वगळता शिवसेना नंतरच्या टप्प्यात लोकसभेत अधिक बलशाली ठरली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मागील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचा नवा प्रयोग जन्माला आला. यात शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले. आता बदललेल्या राजकीय समीकरणानुसार राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांचीही शकले उडाली आहेत. काँग्रेसमध्ये फूट नसली तरी संघटनात्मक पातळीवर त्यांची अवस्था फुटलेल्या शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा बिकट आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात काँग्रेसला आपला गड राखता आलेला नाही.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी, अशी मागणी माजी मंत्री आणि जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्यामार्फत वरिष्ठांकडे करण्यात आली आहे. मात्र ज्यांच्या नावाची शिफारस केली तेच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसचे (Congress) आंदोलन वगळता कुठलाही कार्यक्रम झाल्याचे दिसून येत नाही.
आंदोलनालाही वरिष्ठांची अनुपस्थिती कायम खटकणारी असते. काही मोजकेच कार्यकर्ते घेऊन वरिष्ठांच्या आलेल्या आदेशाप्रमाणे आंदोलनाचे फक्त सोपस्कार पार पाडले जातात. कुठल्याही प्रकारची शाखा बांधणी, पक्ष विस्तार, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण असे कार्यक्रम नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वी काँग्रेसकडे उमेदवार म्हणून ना प्रभावी चेहरा आहे, ना संघटनात्मक पातळीवर त्यांना सूर गवसलेला आहे.
(Edited By : Sachin Waghmare)