Marathwada Political News : शिवसेनेचा विस्तार मुंबई ठाण्यानंतर छत्रपती संभाजीनगरात झाला. त्यानंतर मराठवाड्यातील जिल्ह्यात विस्ताराला गती आली. शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचाराने भारावून गेलेले हजारो तरुण शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र आले. गावोगावी शाखा स्थापन होऊ लागल्या. (Shivsena UBT News) शिवसेना एक प्रमुख पक्ष म्हणून मराठवाड्यात उदयास आला. शिवसेनेला जशी अन्य जिल्ह्यात साथ मिळाली तशीच नांदेड जिल्ह्यानेही दिली. जिल्ह्यात एकेकाळी चार आमदार, नांदेडचा प्रथम महापौर होण्याचा मानही शिवसेनेला मिळाला होता.
नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेने (Shivsena) चांगले अस्तित्व निर्माण केले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, काही पंचायत समितीचे सभापती, नगराध्यक्षपदी सामान्य कुटुंबातील शिवसैनिक विराजमान झाले. (Nanded) शिवसेना हा सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणारा पक्ष बनला. सर्वसामान्य नागरिकांना शिवसेनेचा खूप मोठा आधार वाटायचा. नव्वदच्या दशकात काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने दमदार कामगिरी केली.
युतीची सत्ता राज्यात आल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाड्यातील पहिली विराट सभा नांदेडमध्ये झाली होती. हा काळ शिवसेनेसाठी सुवर्णकाळ होता. मात्र, सध्या शिवसेनेची जिल्ह्यात पडझड सुरू झाली आहे. (Marathwada) जिल्ह्यात एक आमदार व एक खासदार आहेत, तेही शिंदे गटात गेले आहेत. आधीच क्षीण होत असलेली राजकीय शक्ती, त्यात फाटाफुटीमुळे जनाधार कमी होण्यात भर पडली आहे. शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, पक्ष सोडून गेले, पक्षातील गटबाजी, संपर्कप्रमुखांचे दुर्लक्ष, संघटनात्मक पातळीवर बांधणी, शिवसैनिकांमध्ये आलेली मरगळ आदी प्रमुख कारणांमुळे शिवसेनेचा जानाधार कमी होताना दिसतो आहे.
नांदेड जिल्हा हा तसा काॅंग्रेसचा गड मानला जातो. काँग्रेसची राज्यात व केंद्रात दीर्घकाळ सत्ता राहिली, त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणावर व प्रशासनावर या पक्षाची कायम पकड राहिली. या काळात विरोधी पक्षाला पदाधिकारी व कार्यकर्ते मिळणे कठीण होते. काॅंग्रेसची हळूहळू पकड कमी होऊ लागली. ग्रामीण भागातील सत्तेपासून दूर असलेला मोठा वर्ग शिवसेनेकडे आकर्षित झाला त्यांना पदेही मिळू लागली. राजकारणातील प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा लढा सुरू झाल्याने शिवसेनेचा जनाधार वाढला होता.
संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख या पदाला एक विशेष महत्त्व आले. पदाधिकारी एका ध्येयाने प्रेरित होऊन संघटनात्मक पातळीवर काम करीत होते. याचा परिणाम म्हणून हेच पदाधिकारी पुढे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, आमदार, खासदार झाले. जिल्ह्यातील हादगाव, नांदेड, मुखेड, कंधार हे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे गड बनले. या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार हमखास निवडून यायचे. आजही या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे, पण ती सध्या विखुरली आहे. नांदेड शहरातील राजकारणात शिवसेनेची मजबूत पकड होती. नांदेड-वाघाळा महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत युतीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते.
त्यावेळी राज्यात युतीचे शासन होते. शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी राजकीय खेळी करून शिवसेनेचे सुधाकर पांढरे यांना महापौर केले. नांदेडमधून शिवसेनेचे डी. आर. देशमुख, कै. प्रकाश खेडेकर, नांदेड उत्तरमधून अनुसया खेडेकर, दक्षिण- हेमंत पाटील, हादगाव-सुभाष वानखेडे, नागेश पाटील आष्टीकर, कंधार- रोहिदास चव्हाण, मुखेड-सुभाष साबने हे आमदार झाले.
सध्याचे आमदार बालाजी कल्याणकर हे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून सुभाष वानखेडे, सध्याचे खासदार हेमंत पाटील याच मतदारसंघातून निवडून आले आहेत. नांदेड जिल्ह्यात शिवसेना एक प्रमुख पक्ष होता. दुसरीकडे नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मजबूत पकड मिळवली ती १९९९ नंतरच.
आघाडी सरकारच्या काळात अशोक चव्हाणांनी दोन वेळा मुख्यमंत्रिपद भूषविले. या काळात काँग्रेसला खूप मोठे बळ मिळाले व जिल्ह्याची सर्व सूत्र त्यांच्याकडे आली. याचा फटका जसा अन्य पक्षांना बसला तसा शिवसेनेलाही बसला. जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी अशोक चव्हाणांशी मिळते जुळते राजकारण केले, याचा फटका पक्षवाढीला बसला. सध्या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद विखुरली आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी विविध पक्षात गेले, दुसऱ्या पक्षात गेलेले काही नेते पुन्हा पक्षात परतले आहेत. अडीच वर्षांपूर्वी राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे आज शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. येणाऱ्या काळात शिवसेनेला नांदेड जिल्ह्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. विशेषतः पक्षपमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व पक्षाच्या इतर नेत्यांनी नांदेडकडे गांभीर्याने लक्ष दिले तर ते शक्य आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.