Aurangabad Central Assembly Constituency News : संभाजीनगर `मध्य` विधानसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेना खेळणार मराठा कार्ड ?

Will both Shiv Sena play the Maratha card in Sambhajinagar Central Assembly Constituency? : संभाजीनगर शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल हे सलग दोन वेळा निवडून आले आहेत.
MLA Pradeep Jaiswal-Tanwani News
MLA Pradeep Jaiswal-Tanwani NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena v/s Shivsena News : शिवसेना पक्षात कधीही जात पाहून उमेदवारी दिली जात नाही, असं नेहमी म्हटले जाते. मात्र पक्षात फूट पडल्यानंतर आणि राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणावरून सुरू असलेला संघर्ष यातून सगळ्याच राजकीय पक्षाची गणिते बदलली आहेत. उमेदवारी देण्याचा निकषही आरक्षणाच्या विषयामुळे बदलला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महायुतीतून शिवसेनेने संदिपान भुमरे यांच्या रूपाने मराठा चेहरा दिला होता.

राज्यात विशेषत: मराठवाड्यात मराठा आरक्षणाची धग अधिक असताना आणि आठ पैकी सात मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झालेला असताना संभाजीनगर ची जागा मात्र शिवसेनेने (Shivsena) राखली. यामागे मराठा उमेदवार हा मोठा फॅक्टर होता. लोकसभा निवडणुकीत मराठा कार्ड प्रभावी ठरल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विशेषत: मराठवाड्यात महायुती कडून पुन्हा मराठा उमेदवार देण्यावर भर असेल, असे दिसते.

संभाजीनगर शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल हे सलग दोन वेळा निवडून आले आहेत. 2009 मध्ये शिवसेनेने ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापली होती तेव्हा अपक्ष लढत जयस्वाल यांनी विजय मिळवला. तर 2014 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे त्यांना मत विभाजनाचा फटका बसला आणि एमआयएमचे इम्तियाज जलील या मतदारसंघातून निवडून आले होते.

MLA Pradeep Jaiswal-Tanwani News
Political Horoscope Shivsena : वाटचाल शिवसेनेची, काय सांगते स्थापनपत्रिका...

मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रदीप जयस्वाल यांनी शिवसेनेकडून लढत ही जागा पुन्हा खेचून आणली. 2024 मध्ये निवडणुकीला समोर जाताना राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडून गेल्या आहेत. शिवसेनेत फूट पडली असून आमदार प्रदीप जयस्वाल (Pradeep Jaiswal) हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. तर 2014 मध्ये जयस्वाल यांच्या विरोधात निवडणूक लढलेले किशनचंद तनवाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख आहेत.

2014 मध्ये झालेली ही लढत 2024 मध्ये पहायला मिळेल अशी, अपेक्षा होती. मात्र मराठा आरक्षणाचा विषय आणि त्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना असलेली सहानुभूती पाहता मध्य मध्ये उमेदवार देताना दोन्हीही पक्षाकडून मराठा उमेदवाराला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. प्रदीप जयस्वाल आणि किशनचंद तनवाणी हे त्या निकषात बसत नसल्याने कदाचित यावेळी त्यांना वगळले जाऊ शकते.

MLA Pradeep Jaiswal-Tanwani News
MLA Pradeep Jaiswal On CM Shinde : आधी निधीच मिळत नव्हता, आता अकरा महिन्यातच अडीचशे कोटी..

एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची चर्चा आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांचे नाव घेतले जाते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शहरातील मध्य आणि पूर्व या दोन मतदारसंघांमध्ये एमआयएम चे इम्तियाज जलील यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. एकीकडे मुस्लिम मतांमध्ये एकी असल्याचे दिसून आले आहे, अशावेळी विधानसभेला मराठा कार्ड खेळून विजय मिळवण्याचा प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडी कडून केला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com