

मेट्रो प्रवास करताना अनेक प्रवाशांना तिकिटांसाठी लांबलचक रांगेत उभं राहावं लागायचं. काही जण पासचा वापर करून प्रवास करत असले तरी तात्काळ तिकीट घ्यायचं असल्यास लाईन टाळणं अवघड होतं. पण आता 7 मार्गावर प्रवाशांचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे. कारण या मार्गावरील तिकिटे आता 14 पेक्षा जास्त मोबाईल कंझ्युमर अॅप्सवरून सहज उपलब्ध होणार आहेत.
एमएमआरडीएने या 7 मार्गिकांवरील प्रवाशांचा अनुभव अधिक सुधारण्यासाठी विविध सुविधा लागू केल्या आहेत. प्रवाशांना रांगेत उभं राहण्याची गरज कमी व्हावी, वेळ वाचावा आणि प्रवास अधिक सुटसुटीत व्हावा या उद्देशाने ई-तिकिटिंगची सुविधा सुरू करण्यात आली होती. आता त्याच सोयीचा विस्तार करत तिकिट खरेदीसाठी आणखी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत.
8 ऑक्टोबर रोजी भारतातील पहिलं एकात्मिक तिकीट अॅप म्हणून ‘मुंबई वन’ हे अॅप कार्यान्वित करण्यात आलं. या अॅपला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 3 लाखांपेक्षा अधिक डाउनलोड झाले आहेत. क्यूआर कोडवर आधारित तिकिटांची सुविधा या अॅपमध्ये उपलब्ध आहे. दहिसर ते अंधेरी पश्चिम असा मेट्रो 2A आणि दहिसर ते गुंदवली या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे. याशिवाय, आता हीच सुविधा मुंबई वनपुरती मर्यादित न राहता इतर 14 हून अधिक लोकप्रिय अॅप्सवरही दिली जात आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे.
या अॅप्समध्ये वन तिकीट, रेडबस, रेडरेल, यात्री रेल्वेज, इझी माय ट्रिप, हायवे डिलाईट यांसारख्या अॅप्सचा समावेश आहे. त्यामुळे प्रवासी आपल्या आवडीच्या, नेहमी वापरत असलेल्या अॅपमधूनच मेट्रोचे तिकीट सहज खरेदी करू शकणार आहेत. पुढील काही दिवसांत पेटीएम, उबर आणि रॅपिडो यांसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवरही मेट्रो तिकिटांचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांकडे तिकीट घेण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग असणार आहेत.
महत्त्वाचं म्हणजे ही सुविधा केवळ सध्या कार्यरत असलेल्या 2A आणि 7 मार्गिकांसाठीच नव्हे, तर लवकरच सुरू होणाऱ्या मेट्रो 2B (मानखुर्द–मंडाले ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो 9 (दहिसर ते भाईंदर) मार्गिकेवरही लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात सर्व मेट्रोमार्गांवर प्रवास करणे अधिक सोयीचं आणि कटकटीचं नसणार आहे.
या नव्या उपक्रमामुळे मेट्रो प्रवाशांचा वेळ वाचणार, रांगा टळणार आणि प्रवासाचा एकूण अनुभव अधिक आरामदायी होणार आहे. तिकिट खरेदीसाठी स्मार्टफोनवरील एका क्लिकवर सर्वकाही उपलब्ध असल्यामुळे मेट्रो प्रवास आता खऱ्या अर्थाने डिजिटल आणि आधुनिक होत आहे. अशा प्रकारे तिकिटांसाठी रांगेत उभं राहण्याचा त्रास कमी होऊन प्रवासी अधिक मोकळेपणाने आणि जलद गतीने मेट्रोतून प्रवास करू शकतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.