शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार संजय गायकवाड यांचा अपघातात गंभीर जखमी मुलगा उपचारार्थ सरकारच्या १० टक्के राखीव खाट योजनेला पात्र असूनही पुण्यातील रुबी हॉल (Ruby Hall) हॉस्पिटलने नकार दिल्याने हॉस्पिटलच्या विरोधात आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी थेट बेमुदत उपोषणाचेच हत्यार उपसले.
या प्रकरणात अखेर जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी हस्तक्षेप केल्यावर अशोक पवार (Ashok Pawar) यांचे उपोषण स्थगित केले. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी पुढील आठ दिवसात करण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले.
न्हावरा (ता.शिरूर) येथील ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड यांचा १५ वर्षांचा मुलगा विश्वजित हा एका रस्ता अपघातात मेंदूला मार लागल्याने त्याला ३ तारखेला पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचारासाठी दाखल केले गेले. उपचार सुरू करण्यापूर्वी गायकवाड यांनी रुग्णालयाच्या मागणीनुसार १ लाख रुपये एवढी रक्कम मित्रमंडळींकडून संकलीत करुन जमाही केली. दरम्यान १० टक्के राखीव खाट योजनेत गायकवाड हे पात्र ठरत असल्याने त्यांच्याकडून सर्व आवश्यक कागदपत्रांसह धर्मादाय रुग्णालयांच्या तपासणी समितीचे सदस्य आमदार अशोक यांचे शिफारसपत्र देऊन पुढील उपचार सुरू करण्यास विनंती करण्यात आली.
योजनेच्या मागणीनंतर रुग्णालयाकडून अत्यंत गरीब अशा गायकवाड परिवाराकडे वारंवार पैशांची मागणी केली. रुग्ण इथून हलविण्यास सांगितले. या सर्व प्रकारांची माहिती आमदार अशोक पवारांना समजताच ते स्वत: रुग्णालयात दाखल झाले व हॉस्पिटल प्रशासनाकडे दाद मागितली. मात्र आमदारांनाही दाद दिली गेली नसल्याने पवार यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून या प्रकाराबद्दल उपोषणाला बसण्याचेच पत्र जिल्हाधिका-यांना दिले. प्रकरण गंभीर होत चालल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी ससून रुग्णालयाच्या पथकाकडे रुबी हॉलची चौकशी पुढील आठ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश देत गंभीर पावले उचलण्याची ग्वाही पवार यांना दिल्याने उपोषणाचा निर्णय पवार यांनी स्थगित केला.
विश्वजित गायकवाड याचा उपचार रुबी हॉलने सुरू आहे. चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत त्याच्या तब्बेलीला काही धोका झाल्यास त्याला संपूर्ण रुबी हॉल रुग्णालय प्रशासन जबाबदार राहील असाही इशाराही संजय यांनी यावेळी दिला.
विधानसभेत आवाज उठविणार
रुबी हॉलचा राखीव खाट योजनेतील प्रतिसाद रुग्ण व नातेवाईकांसाठी खूपच वाईट आहे. याबाबत अनेक जणांच्या तक्रारी आल्या असून येत्या अधिवेशनात आपण हा प्रश्न उपस्थित करणार आहे. रुग्णालय दक्षता समितीच्या अध्यक्षा आमदार अदिती तटकरे यांच्या येत्या गुरुवारच्या बैठकीतही तक्रारी उपस्थित करुन कारवाईसाठी मी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.