

MPSC परीक्षा 2026 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही परीक्षा 3 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत घेण्यात येणार होती. मात्र, आता या परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.
MPSC कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 चे सुधारित वेळापत्रक पुढील काही दिवसांत जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना नव्या परीक्षेच्या तारखेसाठी आयोगाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात असताना अचानक परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षेसोबतच महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2026 आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2026 या परीक्षांनाही स्थगिती देण्यात आली आहे. या तिन्ही परीक्षांचे सुधारित वेळापत्रक नंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांनी नवीन तारखांसाठी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावरील अपडेट्स तपासत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आगामी मुख्य परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिका नव्याने तयार कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी आणि विविध विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणीही करण्यात आली होती.
मात्र, सध्या तयार असलेल्या प्रश्नपत्रिका रद्द करून नव्याने प्रश्नपत्रिका तयार केल्या जाणार आहेत का, याबाबत MPSC कडून अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे परीक्षा स्थगित झाल्यानंतरही प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम कायम आहे.