

Pune News: राजकारणात टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी नेहमीच शब्दांचाच आधार घ्यावा लागतो असे नाही. कधी एखादे छायाचित्र आणि त्याला दिलेले कॅप्शनही विरोधकांना सूचक उत्तर देण्यासाठी पुरेसे ठरते. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या टीकेला अशाच अनोख्या पद्धतीने उत्तर दिले आहे.
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबतचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी 'ज्युनिअर नवनाथ बन विथ सिनिअर राणे साहेब' असे कॅप्शन दिले आहे. त्यांच्या या पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत. या पराभवावरून भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली होती. निवडणुकीत शिवसेनेकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
या वादात शिवसेना आमदार निलेश राणे यांनीही उडी घेत नवनाथ बन यांच्यावर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना मर्यादा पाळण्याचा सल्ला देत त्यांनी बन यांना थेट त्यांच्या लायकीची आठवण करून दिली होती. 'शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती, तू बोलतो किती,' अशा शब्दांत निलेश राणे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे संताप व्यक्त केला होता.
निलेश राणे यांच्या या टीकेनंतर नवनाथ बन यांनी सोशल मीडियावर नारायण राणे यांच्यासोबतचे छायाचित्र पोस्ट केले. या फोटोमध्ये ते नारायण राणे यांच्या शेजारी बसलेले दिसत आहेत. 'ज्युनिअर नवनाथ बन विथ सिनिअर लिडर नारायण राणे साहेब!' असे कॅप्शन देत त्यांनी आपली पोस्ट शेअर केली.
विशेष म्हणजे, निलेश राणे यांनी केलेल्या टीकेत 'ज्युनिअर' या शब्दाचा संदर्भ होता. बन यांनी त्याच शब्दाचा वापर करत नारायण राणे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला. त्यामुळे त्यांच्या या उत्तराकडे निलेश राणे यांच्या टीकेला दिलेले सूचक प्रत्युत्तर म्हणून पाहिले जात आहे. वरिष्ठ नेत्यांसोबतचे आपले संबंधही त्यांनी या छायाचित्रातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.
पुणे पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक टीकेपर्यंत पोहोचला आहे. नवनाथ बन आणि रविंद्र धंगेकर यांच्यातही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात निलेश राणे यांनी केलेल्या टीकेची भर पडली. मात्र, बन यांनी यावेळी थेट शब्दांत पलटवार न करता फोटो आणि कॅप्शनच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली.
त्यांच्या या पोस्टनंतर आता निलेश राणे काय प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेमधील मतभेद मिटण्याऐवजी सोशल मीडियावरील टोलेबाजीमुळे हा वाद आणखी चर्चेत आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.