

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 10 जून 2026 ला 27 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पक्षीय सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, या वर्षी 10 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एनडीए घटक पक्षांची तातडीची बैठक बोलावली आहे. या राष्ट्रीय बैठकीला देशभरातील एनडीएचे सर्व प्रमुख घटक पक्ष, त्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमात बदल करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची स्थापना 10 जून 1999 रोजी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27 वा वर्धापन दिन सोहळा आता एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. हा पक्षीय सोहळा आता गुरुवार, 11 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबईतील किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. नवी दिल्लीत एनडीएची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्यामुळे हा बदल करण्यात आला असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.
दिल्लीत एनडीए घटक पक्षांची तातडीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 जून रोजी बोलावली आहे. या राष्ट्रीय बैठकीला देशभरातील एनडीएचे सर्व प्रमुख घटक पक्ष, त्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. महायुती आणि एनडीएचा एक भाग म्हणून या बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे 10 जून रोजी दिल्लीत या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येत्या काळात मोठ्या आव्हानांना सामोरे जायचे आहे. त्यासोबतच राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा राज्यव्यापी दौरा करणार आहेत. पक्षाची संघटनात्मक बांधणी बूथ पातळीपासून ते देश पातळीपर्यंत मजबूत करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्ष पहिल्यांदाच वर्धापन दिन साजरा करत आहे. हा वर्धापन दिन 'दादांना समर्पण... संघर्ष आणि संकल्प' या विचाराने साजरा केला जाणार आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अतिशय संयमाने आणि धिरोदत्तपणे पक्षाची धुरा सांभाळत सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली असल्याचे यावेळी तटकरे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.