

Maharashtra political news : राष्ट्रवादी काँग्रेसने डिझाईन बॉक्स या कंपनीला डच्चू दिला आहे. मागील काही वर्षांपासून ही कंपनी राष्ट्रवादीच्या प्रचार-प्रसिध्दीचे नियोजन करत होती. कंपनीसोबतचे कंत्राट संपुष्टात आल्यानंतर राष्ट्रवादीतून आता कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांच्याविरोधात प्रतिक्रियी उमटू लागल्या आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत.
राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियात अरोरा यांच्या आरोप करणारी पोस्ट केली आहे. ही पोस्ट करताना त्यांनी शेवटी ‘#सुत्रधार’ म्हटले आहे. अजितदादांच्या विमानाचा घातपात की अपघात या चर्चेतील मुख्य व लक्ष नसलेलं एक पात्र म्हणजे डिझाईन बॉक्स वाला गडी, नरेश अरोरा! आता पुढील काळ निवडणुका नसल्याने याचं पक्षातील काम संपल असलं तरीही काही बाबी दादांवर जीव ओवाळणाऱ्या जनतेला माहित असाव्या म्हणून हा शब्द प्रपंच, अशी सुरूवात मिटकरींनी केली आहे.
मिटकरींनी कोणते आरोप केले?
राष्ट्रवादीतील सध्या निवडून आलेल्या आमदारांना तिकीट देऊ नये म्हणून चुकीचे सर्व्हे करून याने दादांना दिले. मात्र तेच आमदार ५० हजारांहून अधिक मतांनी निवडून आले. डिझाईन बॉक्सच्या सर्व्हेला न जुमानता अजितदादांनी तिकीट दिले. ही माहिती पक्षातील अनेक आमदारांना आहे, असे मिटकरींंनी म्हटले आहे.
पक्षातील एखादा आमदार नरेश अरोरांना भेटत नाही, ओळखत नाही किंवा नमस्कार करत नाही, या कारणांवरून त्या आमदारांविषयी चुकीची माहिती अजितदादांना अरोरा द्यायचा. सुरुवातीच्या काळात हा संघटनेत प्रामाणिकपणे काम करत असावा, असा विश्वास ठेवून अजितदादांनी काही आमदारांना झापलेही. पण नंतर संबंधित आमदारांनी अरोरांशी संबंध सुधारल्यावर त्यांचे रिपोर्ट आपोआप चांगले येऊ लागले, असा दावा मिटकरींनी केला आहे.
मिटकरी पुढे म्हणतात की, निवडणुकीत अजितदादा अधिक जागा लढवण्याच्या तयारीत असताना याच अरोराने कमी जागा लढवाव्यात, सेना भाजपविरोधात उमेदवार देऊ नयेत आणि दिल्यास त्यांचा प्रचार करू नये, असे प्रयत्न केले. अजितदादांच्या अनेक सभा रद्द करण्यात आल्या. अजितदादांना या सर्व गोष्टींची जाणीव होती. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात नवीन प्रचारयंत्रणा उभी करणे योग्य ठरणार नाही म्हणून त्यांनी या गोष्टींमध्ये लक्ष घातले नाही.
पत्रके वाटणे, बॅनर लावणे आणि वातावरण निर्मिती करणे या नावाखाली पक्षाकडून अरोरा आर्थिक लाभ घेत असला तरी प्रत्यक्षात काहीच काम झाले नव्हते. अजितदादांवर विविध माध्यमांतून टीका होत असताना याने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही व कोणतीही प्रभावी प्रतिक्रिया दिली नाही. याला महाराष्ट्राचा इतिहास, राजकारण आणि समाजकारण याविषयी एक टक्काही माहिती नव्हते, असा आरोपही त्यांनी केला आहे.
१०–१२ फोटोग्राफर लावणे आणि दादाना पिंक जॅकेट घालण्याचा सल्ला देणे, यापलीकडे अरोराचे कोणतेही ठोस योगदान नव्हते. अजितदादा सत्तेत होते आणि ४१ आमदार निवडून आले, हे संपूर्ण श्रेय अजितदादांनाच जाते. त्यात इतरांचे व याचे काडीचेही योगदान नव्हते. अजितदादांनी अवाजवी घोषणा कराव्यात, अशा सूचना अरोरा द्यायचा. मात्र दादांनी स्पष्ट शब्दांत नकार देत सांगितले की, “मी जे करू शकतो तेच लोकांसमोर बोलणार,” आणि त्यांनी ते काटेकोरपणे पाळले, असे मिटकरी यांनी नमूद केले आहे.
पवार साहेबांवर टीका करावी, अशा सूचना तो द्यायचा. मात्र अजितदादांनी त्या कधीही मान्य केल्या नाहीत. राष्ट्रवादीच्या जोरावर अरोराने एक विमान कंपनी स्थापन केल्याची माहिती ऐकिवात आहे. सेकंड-हँड विमान खरेदी केल्याचेही सांगितले जाते. या प्रश्नाची उत्तरे दिल्याशिवाय याने महाराष्ट्र सोडू नये, असे मिटकरी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.