

तुमच्याकडे कार असेल आणि तुम्ही FASTag अॅन्युअल पास घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. थोडीशी निष्काळजीपणा केल्यास थेट आर्थिक फटका बसू शकतो, इतकेच नव्हे तर तुमची वैयक्तिक माहितीही धोक्यात येऊ शकते. NHAI (National Highways Authority of India) ने FASTag वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली असून, वार्षिक FASTag पास घेण्याच्या तयारीत असलेल्या वाहनधारकांनी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सध्या सायबर गुन्हेगारांनी FASTag अॅन्युअल पासच्या नावाखाली फसवणुकीचा नवा मार्ग शोधून काढला आहे. सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, एसएमएस अशा विविध माध्यमांतून बनावट लिंक आणि वेबसाइट्सच्या माध्यमातून लोकांना अडकवले जात आहे. “एका वर्षाचा FASTag पास घ्या”, “स्वस्त दरात FASTag अॅन्युअल पास” अशा आकर्षक जाहिराती दाखवून वाहनधारकांना आमिष दाखवले जात आहे. अनेकजण या लिंकवर क्लिक करून पैसे भरतात आणि नंतर त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येते.
या पार्श्वभूमीवर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI ने स्पष्ट इशारा दिला आहे. NHAI च्या माहितीनुसार FASTag अॅन्युअल पास हा फक्त आणि फक्त अधिकृत Rajmargyatra मोबाइल ॲपवरूनच उपलब्ध आहे. याशिवाय कोणतीही वेबसाइट, दुसरे ॲप किंवा लिंक FASTag अॅन्युअल पास देत असल्याचा दावा करत असेल, तर तो पूर्णपणे बनावट आणि फसवणुकीचा प्रकार आहे.
अनेक फसव्या वेबसाइट्स अगदी खऱ्यासारख्या दिसतात. त्यावर सरकारी लोगो, आकर्षक ऑफर्स आणि तातडीने पास घ्या अशा सूचना दिलेल्या असतात. मात्र अशा ठिकाणी तुमची गाडी नंबर, FASTag नंबर, मोबाइल नंबर किंवा बँक तपशील टाकल्यास त्याचा गैरवापर होण्याची मोठी शक्यता असते. यामुळे केवळ पैसेच जात नाहीत, तर तुमच्या वाहनाशी संबंधित महत्त्वाची माहितीही सायबर गुन्हेगारांच्या हाती लागू शकते.
तसेच कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, सोशल मीडियावर किंवा मेसेजमधून आलेल्या ऑफर्सवर विश्वास ठेवू नये आणि आपल्या FASTag किंवा वाहनाशी संबंधित माहिती कुणालाही शेअर करू नये, असेही NHAI ने सांगितले आहे. थोडीशी जागरूकता आणि सावधगिरी बाळगल्यास तुम्ही सायबर फसवणूक, आर्थिक नुकसान आणि भविष्यातील अडचणी टाळू शकता.
एकूणच, FASTag अॅन्युअल पास घ्यायचा असेल तर अधिकृत मार्गाचाच अवलंब करा. आकर्षक ऑफर्स, कमी दर किंवा तात्काळ पास मिळण्याच्या भूलथापांना बळी पडू नका. सुरक्षित आणि सरकारी ॲपचा वापर करूनच व्यवहार करा, हाच तुमच्यासाठी योग्य आणि सुरक्षित पर्याय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.