Political News : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पटलावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या दोन्ही गटांची पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरू आहे. तर आता दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती दोघांकडे एक याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये शरद पवार यांच्या गटातील सदस्यांना अपात्र करा, या मुख्य मागणीसाठी ही याचिका आहे. यात विशेष बाब म्हणजे या याचिकेतून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचे नाव मात्र वगळण्यात आले आहे. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल हे नेहमीच भाजपाला मदत करीत असल्याने कारवाईची मागणी केली आहे.
आमची भाजपसोबतची लढाई ही वैचारिक आहे. मात्र, अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल भाजपला मदत व्हावी, अशी भूमिका नेहमीच घेत असतात. भाजपच्या चुकीच्या धोरणाला पाठींबा देत असल्याने प्रफुल पटेल यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली असल्याचे पुण्यात पत्रकारांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आम्ही चुकीच्या घटनांना विरोध करणारे आहोत. कोणाचे धोरणात्मक निर्णय जर चुकीचे असतील तर आम्ही त्याला मुळातच पाठिंबा देत नाही. मात्र, अजित पवार (Ajit pawar) गटाचे खासदार प्रफुल पटेल हे नेहमीच भाजपला मदत करीत असल्याने कारवाईची मागणी केली आहे. त्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह केंद्रातील गृहखाते सांभाळतात की राज्यातील भांडणे मिटवतात, असा खोचकही सवाल त्यांनी केला.
शरद पवार गटाचे समर्थक राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाने केली आहे. तर लोकसभेतील खासदार श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांचेही सदस्यत्व रद्द करण्याची मागणी याचिकेतून केली आहे. बुधवारी शरद पवार गटाच्या खासदारांनी राज्यसभा सभापती जयदीप धनखड यांची भेट घेत खासदार प्रफुल पटेल यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
(Edited by Sachin Waghmare)