

Beed Political News : परळी तालुका हा मुंडेंचा राजकीय गड म्हणून ओळखला जातो. दिवंदत गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात याच मतदारसंघातून केली. पुढे त्यांचा राजकीय वारसा चालवणाऱ्या पंकजा मुंडे आणि आता धनंजय मुंडे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. पक्ष वेगळे असले तरी मुंडे घराण्याचे वर्चस्व परळीवर कायम राहिले. पंकजा मुंडे यांनी केलेलेल्या एका विधानाने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. 'मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली, आता ते परळी सांभाळतात, मी माळीकोळी सांभाळेन'असे त्या म्हणाल्या. या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहीण विरुद्ध भाऊ म्हणजेच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या झालेल्या लढतीत धनंजय मुंडे यांची सरशी झाली आणि पंकजा यांचा पराभव झाला. त्यांनतर पाच वर्षात राज्यात, बीड जिल्ह्यात आणि परळीमध्येही अनेक राजकीय घडामोडी घडल्या. धनंजय मुंडे दुसऱ्यांदा परळीतून आमदार म्हणून निवडून आले. तर पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेवर घेत मंत्री केले.
परळीचा बहुतांश कारभार आता धनंजय मुंडे हेच पाहतात हे आता स्पष्ट झाले आहे. पंकजा मुंडे यांनीही याला दुजोरा देणारे एक विधान नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी येथील दिवगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या लोकार्पणाप्रसंगी केले. माजी आमदार गोविंद केंद्रे, धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात पकंजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
धनंजय मुंडे हे अडचणीत असताना मी मागचं सगळं विसरून त्याच्या जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न केला. गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला त्याग शिकवला, त्या त्यागाच्या भावनेतूनच मी आणि धनुभाऊ एकत्र आलो, ते 'डीएम' आहेत तर मी 'पीएम' आहे, असा चिमटाही पंकजा मुंडे यांना काढला. धनंजय मुंडे हे गोविंद केंद्रे यांचे मेहुणे आहेत. आज मेहुण्याचा चेहरा पाहून त्यांचाही चेहरा खुलला. पण केंद्रे यांनी मेहुण्यापेक्षा गोपीनाथ मुंडे यांच्यावरील प्रेमाखातर कायम त्यांची साथ दिली, हे मी कधीही विसरू शकणार नाही.
गोपीनाथ मुंडे यांना जाऊन बारा वर्ष झाली तरी त्यांचा पुतळा आजही उभारला जातो, हे प्रेम पाहून मी भारावले आहे. गोपीनाथ गड हा माझ्या मालकीचा नाही, मुंडे परिवाराच्या, धनजंयच्या मालकीचा नाही, तो तुमचा आहे. या गडाची प्रत्येक वीट ही तुमच्या खर्चाची आहे. तुम्हाला एक हक्काचे ठिकाण मिळावे या उद्देशाने गोपीनाथ गडाची उभारणी झाल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.