-जालिंदर सत्रे
Patan News : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यात कृषी विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे कृषी विभाग सलाईनवर असल्याचे चित्र आहे. जग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोग शेतात राबवीत आहे. मात्र, रिक्त पदांमुळे पाटणचा शेतकरी आधुनिक शेती कोणाच्या आधारावर करणार? असा प्रश्न येथील शेतकरी उपस्थित करत आहेत.
सात खोरी आणि १४ उपखोऱ्यांत पाटण तालुका Patan Taluka विभागला असून, तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १,४०,३६४ हेक्टर आणि लागवडीलायक क्षेत्र ७४,०९६ हेक्टर आहे. शेतकऱ्यांची Farmers संख्या दीड लाखाच्या घरात असून, शेतमजुरांची संख्या जास्त आहे. खरीप हंगामातील पिकांवर अवलंबून असणारा शेतकरी वर्ग डोंगर उतारावर व दुर्गम भागात विखुरलेला आहे.
पाटण तालुका भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय तालुक्यात पाहावयास मिळत नाहीत. त्यामुळे लहरी मॉन्सूनवर अवलंबून असणारा फक्त खरीप हंगामातील पिकांवर कुटुंबाचा गाडा हाकू शकत नाही. परिणामी, मुंबईसारख्या शहरात स्थलांतर केलेली शेतकरी कुटुंबे दुर्गम भागात पाहावयास मिळतात, हे सत्य नाकारता येत नाही.
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी आर्थिक सक्षम व्हावे, यासाठी तालुक्यात तालुका कृषी विभाग कार्यरत आहे; परंतु गेली अनेक वर्षे या कार्यालयात रिक्त पदांची संख्या वाढत आहे. तालुका कृषी अधिकारी पदे गेली अनेक वर्षे प्रभारी पदावर चालले होते. सध्या हक्काचे तालुका कृषी अधिकारी कुंडलिक माळवे काम पाहात आहेत.
मात्र, कृषी पर्यवेक्षक ही मंजूर नऊ पदे आणि सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक ही प्रत्येकी एकेक पदे पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. इतर पदांचा आकडा फुगत चालला आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी शंभूराज देसाई यांनी काळोली येथे कृषी विभागाची कोट्यवधी रुपयांची प्रशासकीय इमारत मंजूर केली असून, सध्या या इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. सर्व सोयीसुविधा कार्यालयात उपलब्ध असाव्यात. मात्र, त्या कार्यालयात ५० टक्के पदे रिक्त आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी अनभिज्ञ असावेत, हे न पटणारे आहे.
नेत्यांच्या गावांतच कृषी सहायकांची वानवा
मंजूर चार लिपिक पदांपैकी दोन, अनुरेखक सहा, वाहन चालक एक, शिपाई सातपैकी पाच आणि सर्वात महत्त्वाचे असणाऱ्या कृषी सहायक ४९ पदांपैकी फक्त १९ कार्यरत असून, तब्बल ३० पदे रिक्त आहेत. यामध्ये माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पाटण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंचे मरळी, खासदार श्रीनिवास पाटील यांचे मारुल हवेली आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुंभारगाव या गावांना कृषी सहायक नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.