Sangali Political News : टेंभू पाणी योजनेवरून सांगली जिल्ह्यातील राजकारण तापलं आहे. भाजपचे खासदार संजय पाटील आणि आमदार सुमनताई पाटील आमने-सामने आले आहेत. दुष्काळी भागाला टेंभू उपसा योजनेतून पाणी मिळावे, अन्यथा उपोषणाचा इशारा आमदार सुमनताई पाटील यांनी दिला आहे.
त्यानंतर भाजप खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ज्याच्या घरात 45 वर्षे सत्ता आहे. त्यांनी उपोषणाचा इशारा द्यावा, ही आगतिकता आहे. आमदार सुमन पाटील यांना आपल्या सुपुत्राच्या भवितव्याची चिंता वाटते आहे, त्या पुत्रप्रेमात आंधळ्या झाल्या आहेत, अशी टीका खासदार संजय पाटील यांनी केली.
टेंभू योजनेतून आठ गावांसाठी पाणी द्यावे, यासाठी उपोषण म्हणजे आबा कुटुंबाच्या ४५ वर्षांच्या अपयशाची कबुली आहे. जिल्हा परिषद सदस्य ते उपमुख्यमंत्रिपदापर्यंत ज्या सावळज परिसराच्या जिवावर मजल मारली, त्या गावांना हक्काचे पाणी दिले नाही. वंचित गावाचा टेंभू विस्तारित योजनेमध्ये समावेशासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यात आणली आहे. हे सांगितल्यानंतर उपोषणाची नौटंकी व राजकीय स्टंटबाजी सुरू आहे, असा टोला खासदार संजय काका पाटील यांनी लगावला आहे.
आर. आर. पाटील यांच्या काळातील भाषणे, घोषणा, आश्वासनांची जंत्री बाहेर काढावी लागेल. त्यांनी जनतेला कसे भुलवले, याचा हिशेब मांडावा लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला. येत्या महिनाभरात विस्तारित टेंभू योजनेची सुधारित प्रशासकीय मंजुरी मिळणार आहे. या गावांना पाणी येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
सुमनताई पाटील यांचा इशारा
टेंभू व म्हैसाळ उपसा जल सिंचन योजनेतून सध्या आवर्तन सुरू असून, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील भागाला पुरेसे पाणी मिळालेले दिसून येत नाही. आमदार सुमनताई पाटील यांनी दौरा करून याची माहिती घेतली होती. या वेळी कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, रायवाडी व तासगाव तालुक्यातील जरंडी, यमगरवाडी, दहिवडी या गावांना पुरेसे पाणी मिळत नाही. पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा आमदार सुमनताई पाटील यांनी दिला होता.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.