राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पंढरपूरचे साखर कारखानदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व अभिजित पाटील यांना बारामती ते कापसेवाडी (माढा ) अशी एअर लिफ्ट दिली. या हवाई प्रवासात पवार आणि पाटील यांच्यात काय बोलणे झाले, ते अद्याप समोर आले नसले तरीही या हवाई सफरीची सोलापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा मात्र रंगली आहे.
शरद पवारांचा गुरुवारी कापसेवाडी येथे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा होता. त्या मेळाव्यास शरद पवार हेलिकॉप्टरमधून जाणार होते. दरम्यान, पंढरपूरहून काही कामानिमित्त अभिजित पाटील हे बारामती येथे गेले होते. तेथून पवारांनी हेलिकॉप्टरमध्ये पाटील यांनाही कापसेवाडीपर्यंत सोबत घेतले. यादरम्यान त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले हे समजू शकले नाही, परंतु जिल्ह्याच्या राजकारणावर नक्कीच चर्चा झाली असावी, असे अनुमान काढले जात आहे.
अभिजित पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून पुढे येत आहेत. एकेकाळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, परंतु गेल्या सहा वर्षांत जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला लागले आहेत. आघाडीचे सगळे नेते शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या सोबत गेले आहेत. त्यामुळे पवारांनी पुन्हा नव्याने पक्षउभारणीचे काम सुरू केले आहे. अभिजित पाटील हे या कामात पवारांचे आजचे विश्वासू आणि एकनिष्ठ शिलेदार म्हणून उभे राहिले आहेत. सहा महिन्यांपूर्वी शरद पवारांनी अभिजित पाटील हे पक्षात नसतानाही टेंभुर्णी ते भिगवण या प्रवासात आपल्या कारमध्ये एकत्र प्रवास केला होता. त्यानंतर काही महिन्यांतच अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आज संपूर्ण जिल्ह्याची धुरा त्यांच्याकडे आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बुधवारी भाजपचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्याच वेळी अभिजित पाटील यांनीही धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपने उमेदवारी न दिल्यास महाविकास आघाडी सोबत यावे, त्यांना महविकास आघाडी निवडून आणेल, असे वक्तव्य केले होते. एका अर्थाने मोहिते पाटलांना अभिजित पाटलांनी थेट राष्ट्रवादीत येण्याचे आवाहन केले होते.
या पार्श्वभूमीवर बारामती ते माढा या हवाई प्रवासात शरद पवार आणि अभिजित पाटील यांच्यात नेमके काय बोलणे झाले असेल, काय राजकीय खलबते झाली असतील, याविषयी जिल्ह्यात चर्चा सुरू आहे .