कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात तीन लाख मतदार असून, प्रचारासाठी तीन लाख कार्यकर्ते राज्यभरातून येतील, असे विधान करुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खळबळ उडवून दिली आहे. यावरून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पाटील यांची खिल्ली उडवली आहे. याला भाजपचे समरजीतसिंह घाटगे (Samarjitsinh Ghatge) यांनी प्रत्युत्तर दिले असून, दोघांमध्ये जुंपल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीमुळे कोल्हापूरमधील राजकारण तापले आहे. यावरून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, असा संघर्ष सुरू झाला आहे. राज्यभरातून तीन लाख कार्यकर्ते कोल्हापूरात येतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे मोठे पडसाद उमटत आहेत. यावर कोल्हापूरात युद्ध करायचे आहे का, असा सवाल मुश्रीफांनी केला आहे. युद्ध करायचे असे तर भाजप कार्यकर्त्यांना युक्रेनला पाठवा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. आता या वादात भाजपच्या घाटगेंनी उडी घेतली आहे.
देशद्रोह्यांशी संबंधाचे आरोप असणाऱ्या मलिकांच्या समर्थनासाठी तुम्ही कोल्हापूरच्या ऐतिहासिक भूमीत फिरला तेव्हा कोल्हापूरचा स्वाभिमान आठवला नाही का, असा सवाल घाटगेंनी केला आहे. ते म्हणाले की, मंत्री नवाब मलिकांचा दाऊद इब्राहिमशी संबंध आहे. मलिकांनी हसीना पारकरला पैसे दिले त्या पैशांचा वापर करून दाऊदने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केले. या बॉम्बस्फोटात असंख्य भारतीय मारले गेली. न्यायालयाच्या आदेशानुसार ते आज तुरुंगात आहेत. ज्या मलिकांनी रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घोषणा देण्यास नकार दिला. अशा मलिकांच्या पाठिंब्यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी कागल येथे रॅली काढली. यावेळी कोल्हापूरकरांचा आणि कोल्हापूरच्या अस्मतेचा अपमान होत नाही का?
कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) आमनेसामने आले आहेत. कोल्हापूर उत्तरची लढत पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठेची केली आहे. यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्यूमुळे ही जागा रिक्त झाली आहे. येथून त्यांच्या पत्नी जयश्री जाधव मैदानात उतरल्या आहेत. जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने सत्यजित कदम यांना मैदानात उतरवले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.