Kolhapur : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शुक्रवारी कोल्हापुरात दसरा चौकात निर्धार सभा होत आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शाहू महाराज हे आहेत. राष्ट्रवादीतील बंडखोरी आणि त्यानंतर राज्यातील घडामोडींवर सभेतून पवार कुणाकुणावर निशाणा साधणार, याकडे कोल्हापुरकरांसह राज्याचे लक्ष लागलेले आहेत, छगन भुजबळांचे येवला, धनंजय मुंडेंच्या बीडनंतर आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या बालेकिल्ल्यात पवारांची ही सभा होत आहे. मागील दोन सभेंप्रमाणे आता कोल्हापुरातील पवारांच्या सभेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विचाराला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्यासोबत सत्तेत गेले. मुश्रीफ सत्तेत गेल्यानंतर कोल्हापुरातील राष्ट्रवादी संपली, अशी अवई मुश्रीफ कार्यकर्त्यांनी उठवली. मात्र, या अफवेला छेद देत, पवार यांचे खंदे आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची तुफान गर्दी शुक्रवारी दसरा चौकात जमली आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि उद्योगपती व्ही. बी. पाटील हे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत. मात्र, तळागाळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत त्यांची लोकप्रियता झालेली नाही. अशावेळी राष्ट्रवादीच्या कोल्हापुरातील सभेला गर्दी होणार का? अशी चर्चा रंगली होती. पण प्रत्यक्षात आज गर्दीचा महापूर दसरा चौकात आल्याचे दिसते.
कोल्हापुरातील सभेत कार्यकर्त्यांची फौज उभी करण्यासाठी रोहित पाटील यांनी देखील मागील दोन दिवसांत तालुकास्तरावर दौरे केले. निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोट बांधत त्यांनी मेळावे घेतले. त्याचा परिणाम आजच्या सभेत झाल्याचा दिसून येत आहे.
मुश्रीफांनी उडवली पवारांच्या सभेची खिल्ली....
अजित पवार (Ajit Pawar) आमचे नेते आहेत, राष्ट्रवादीत गट नाहीत अशी टिप्पणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीच केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्यावर बोलताना मुश्रीफ यांनी मी त्यांच्या वक्तव्याचे स्वागत करतो. परमेश्वराच्या कृपेने ते खरे व्हावे. पवारसाहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पवारांनी मन बना लिया है! असं म्हणत पवारसाहेब आज कोल्हापुरात येणार आहेत. ते एनडीएसोबत येणार आहेत का? हे त्यांनाच विचारा असेही ते म्हणाले.
कोल्हापुरात होणाऱ्या शरद पवार यांच्या सभेला गर्दी व्हावी,अशा शुभेच्छा मुश्रीफ यांनी देत सभेला इस्लामपूर आणि सांगली जिल्ह्यातील लोक येतील. असं म्हणत खिल्ली उडवली होती.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.