Ahmednagar Politics News : मराठवाड्याची शेतीची तहान भागवण्यासाठी नगर-नाशिक जिल्ह्यांतील धरण समूहातून 8 टीएमसी पाणी देण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नगर-नाशिक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना असून, दोन्ही जिल्ह्यांतील नेते मंडळींकडून जायकवाडीला पाणी सोडण्यास मोठा विरोध पुढे येत आहे. अशात नगर जिल्ह्यातील नेते मंडळीत विरोधापेक्षा आपापसात आरोप आणि टीका-टिप्पणी सुरू असल्याने आता या नेत्यांनी एकत्रित येऊन विरोध करावा, यासाठी कोपरगावचे अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. (Latest Marathi News)
समन्यायी पाणी वाटप कायदा 2005 ला मंजूर झाला. त्यावेळी या कायद्याचा मसुदा विधानपरिषदेत तत्कालीन जलसंपदामंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडला होता. त्यामुळे माजी आमदार भानुदास मुरकुटे तसेच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी टीकेची झोड उठवली आहे, तर बाळासाहेब थोरातांनी जायकवाडीला पाणी देण्याचे आदेश येत असताना उत्तरेतील इतर नेते गप्प का, असा प्रश्न विखे, मुरकुटेंना विचारला आहे.
थोरात-विखे-मुरकुटे यांच्या मध्ये या विषयावर सध्या रोज आरोप-प्रत्यारोप होत असताना कोपरगावमध्ये आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे यांनीही आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. नेवशाचे शिवसेना आमदार शंकरराव गडाख यांनी तीन दिवसांपूर्वीच नगर-संभाजीनगर महामार्ग घोडेगाव इथे अडवून या प्रश्नावर भव्य रास्ता रोको केला. मात्र, त्यांनी पाणी द्यायचे असेल, तर मुळा धरणाऐवजी सर्व पाणी निळवंडे धरणातून द्यावे अशी मागणी केली. त्यांच्या मागणी नंतर अकोले तालुक्यातून आ. गडाख यांनी केलेल्या मागणीचा जोरदार निषेध करण्यात आला. निळवंडे धरणातून अकोल्याच्या वंचित गावांना पाणी मिळावे म्हणून दोन दिवसांपूर्वी किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने जलसंपदा कार्यालयात आंदोलन करत कार्यालयाला टाळे ठोकले.
एकीकडे मराठवाड्यातील माजी मंत्री राजेश टोपे, आ. संजय शिरसाठ आदी अनेक नेते जलसंपदाचा आदेश निघूनही नगर-नाशिक जिल्ह्यांतील धरण समूहातून पाणी अद्याप सोडले जात नसल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करत सर्वपक्षीय दबाव वाढवत असताना नगर जिल्ह्यातील दिग्गज म्हणवणारे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र आहे.
या परस्थितीत आता कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत असून, हा प्रश्न एकजुटीच्या ताकतीने सुटणार असल्याने नगरसह नाशिक जिल्ह्यातील नेत्यांना संपर्क करून जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध करण्याचे प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत. आमदार आशुतोष काळे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अन्नपुरवठामंत्री छगन भुजबळ, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, आमदार शंकरराव गडाख, आमदार प्राजक्त तनपुरे, मोनिका माणिकराव कोकाटे, दिलीपराव बनकर, सीमाताई हिरे, राहुल ढिकले, किरण लहामटे, हिरामण खोसेकर, लहू कानडे, सरोजिनी आहेर या आमदारांशी दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्यान विचार करून जायकवाडीला जाणारे पाणी वाचविण्यासाठी चर्चा केली आहे.
एकंदरीत आता समन्यायी पाणीवाटप कायद्याचाच पुनर्विचार करण्याच्या मागणीने आता जोर धरला असला तरी यंदा नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष एव्हाना सुरू झाला आहे. राज्य सरकार आता या पेटत असलेल्या प्रश्नावर कसे उत्तर शोधते हे पाहावे लागणार आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.