Satara Political News : सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगड संवर्धनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा, त्यासाठी राज्यस्तरावरुन अधिकचा निधी दिला जाईल. तसेच जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने इको टुरिझमला गती दिली जाईल, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा योजनांच्या राज्यस्तरीय बैठक पुण्यात पार पडली. यात पुणे विभागाच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरातील जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, नियोजन समितीचे शशिकांत माळी आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेमध्ये देण्यात येणारा निधी प्राधान्याने सामाजिक क्षेत्रातील विविध योजनांवर दिला जातो. हा निधी शिक्षण, आरोग्य, पर्यटन, महिला व बाल विकास, कृषी, मृद व जलसंधारण क्षेत्रासाठी उपयोगात आणावा, असे आवाहन केले. यावेळी आमदार मकरंद पाटील यांनी वाई मतदारसंघासह सातारा जिल्ह्याला सर्वाधिक निधी द्यावा, तसेच पर्यटन व प्रतापगडच्या विकासासाठी निधी मिळण्याची मागणी केली.
मकरंद पाटलांच्या मागणीवर अजितदादांनी, सातारा जिल्ह्याने प्रतापगड किल्ला संवर्धनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा. त्यासाठी राज्यस्तरावरून निधी देण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून इतर कामे करता येतील. तसेच इको टुरिझममुळे पर्यटकांची संख्या वाढत असल्याने त्यासाठीही आवश्यक निधी देण्यात येईल, असे स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये प्रधानमंत्री स्कूल रायझिंग इंडिया, अमृत योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जल जीवन मिशन, हर घर जल, ट्रॅव्हल फॉर लाईफ, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आदींचा समावेश आहे. या केंद्राच्या योजनांची अभिसरणाद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देशही पवारांनी यावेळी दिले.
डुडींना पुण्याची ऑफर...
साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांपुढे जिल्ह्यातील विविध विकासकामे व नियोजन आराखड्याचे योग्य पद्धतीने सादरीकरण केले. यामुळे डुडी यांचे पवारांनी कौतुक केले. इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आपले सादरीकरण करणे आवश्यक आहे. तुमच्यासारख्या जिल्हाधिकाऱ्याची पुण्यात गरज आहे. तुम्ही पुण्यात यावे, अशी ऑफरही अजित पवारांनी डुडी यांना दिली.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.