Karad News, 30 Oct : तासगाव-कवठेमहांकळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी आर. आर. पाटील यांच्यावर गंभी आरोप केला.
आबांनी (R.R Patil) आपला केसाने गळा कापल्याचं वक्तव्य अजितदादांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापलं असून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अशातच या सर्व प्रकरणावर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिवाय सिंचनाच्या प्रकरणाची चौकशी मी लावली नव्हती, ते प्रकरण गृहमंत्र्यांच्या स्तरावर हाताळलं गेल्याचंही त्यांनी सांगितलं. अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर बोलताना पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, सिंचन घोटाळा प्रकरणाची श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश सिंचन खात्याला मी दिला होता. पण मी 70 हजारांचा घोटाळा शब्द कधीही वापरला नव्हता, श्वेतपत्रिका म्हणजे चौकशी नाही.
अजित पवारांच्या (Ajit Pawar) 2010-11 च्या आर्थिक अहवालात 10 वर्षात 70 हजार कोटी खर्च झाल्याचा उल्लेख होता. मात्र, सिंचनाची टक्केवारीही जास्त वाढली नव्हती. मी मुख्यमंत्री म्हणून आलो तेव्हा हे पाहून धक्का बसला. त्यामुळे त्याची शहानिशा करण्यासाठी मी सिंचन खात्याला या प्रकरणाची नेमकी वस्तूस्थिती काय आहे? याबाबतचा अहवाल सादर करा, असं सांगितलं. पण अशा चुका पुन्हा होऊ नयेत हा माझा त्यामागचा उद्देश होता, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, यावेळी त्यांनी आपला काहीही संबंध नसताना नाहक बळी घेतल्याचं चव्हाण यांनी म्हटलं. ते म्हणाले, "या प्रकरणाची विधिमंडळात चर्चा झाली. विदर्भ सिंचन महामंडळाच्या घोटाळ्याची खुली चौकशी व्हावी असा अहवाल गृहमंत्र्यांना (Home Minister) सादर करण्यात आला. अँटी करप्शनकडून चौकशी करण्याचे आदेश द्या, असा त्यात उल्लेख होता.
मला नंतर कळलं की गृहमंत्र्यांनी आपल्या स्तरावर ती मान्यता दिली होती, ज्याचा उल्लेख अजित पवारांनी केला. शिवाय या प्रकरणाची फाईल माझ्याकडे आली नाही आणि त्यावर मी सही देखील केली नाही. 70 हजार कोटींच्या प्रकरणात मी चौकशी लावली नाही.
मात्र माझा नाहक बळी घेतला, 2014 ला माझं सरकार पाडलं आणि अजित पवारांनी भाजपच्या राजवटीची मुहूर्तमेढ केली. ही वस्तूस्थिती आहे. ती फाईल मी अद्यापही बघितली नाही. त्या फाईलला गृहमंत्र्यांच्या स्तरावरुन मान्यता मिळाली होती. गृहमंत्र्यांनी याबाबत कोणाला विचारला का ते माहिती नाही आणि आता आपण ते त्यांना विचारु शकत नाही.
अजित पवार जे बोलले ते खरं आहे पण त्यात माझा काय दोष आहे हे सांगितलं असते तर बरं झालं असतं. राज्य सहकारी बँक आणि सिंचन प्रकरण हे मी राज्याच्या हिताचे निर्णय घेतले, त्याची शिक्षा मला भोगावी लागली. मात्र त्याची मला काही चिंता नाही, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवारांच्या प्रकरणाची चौकशी गृहमंत्री म्हणजे आर.आर पाटील यांच्या स्तरावर लावली गेल्याचं सांगितलं.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.