

Solapur, 19 January : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे आणि भाजप नेत्या रश्मी बागल यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे. त्यांचा सामना करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्याशी होण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ आणि पंचायत समितीच्या १३६ जागा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार हे घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. सोलापूर (Solapur) जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व पुन्हा एकदा मोहिते पाटील यांच्याकडे जाण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीतील मोहिते पाटील विरोधक सावध झाले आहेत, त्यातूनच त्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केल्याचे दिसून येते.
माजी आमदार संजयमामा शिंदे (Sanjaymama Shinde) हे मोहिते पाटील विरोधक म्हणून ओळखले जातात. मध्यंतरी सोलापूर जिल्ह्यात समविचारीचा प्रयोग झाला, त्यावेळी संजयमामा शिंदे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. त्या वेळी सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, शहाजीबापू पाटील हे एकत्र आले होते. तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी त्यांना पाठबळ दिले होते. आताही पुन्हा हे सर्वजण एकत्र येण्याची शक्यता आजच्या भेटीमुळे बळावली आहे.
संजयमामा शिंदे हे करमाळ्याचे माजी आमदार असून त्या ठिकाणी रश्मी बागल ह्या त्यांच्या विरोधक आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संजयमामा शिंदे आणि त्यांच्या करमाळ्यातील विरोधक रश्मी बागल यांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आहे.
सोलापुरातील एका हॉटेलमध्ये पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत संजयमामा शिंदे आणि रश्मी बागल यांच्यात बैठक झाल्याची माहिती आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दोघांना एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे. करमाळ्यात जिल्हा परिषदेच्या 06 एवढ्या जागा असून पंचायत समितीच्या 12 जागा आहेत. यातील कोणाला किती वाटा मिळणार, याचे उत्तर येत्या दोन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.