
Kolhapur News, 08 Aug : कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यानंतर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसेल. ही वस्तुस्थिती केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारला पटवून देखील कर्नाटक आपली भूमिका सोडण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा कर्नाटकच्या भाजपच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राच्या विरोधात वाकडे पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
कर्नाटकातील भाजप खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन अलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णय हा कर्नाटकचा वैध हक्क असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात संतप्त भावना उमटल्या आहेत.
कृष्णा जलवाटप न्यायाधीकरण-2 च्या आदेशानुसार ही उंची वाढ अनुमोदित आहे. त्यामुळे महाराष्ट्राने यावर आक्षेप घेणे अनुचित असल्याचे मत यावेळी कर्नाटकातील खासदारांच्या शिष्टमंडळाने मांडले आहे. या शिष्टमंडळामध्ये कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, खासदार गोविंद कारजोळ, पी. सी. गद्दीगौडर, रमेश जिगजिणगी आणि इतर वरिष्ठ नेते सहभागी होते.
भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोम्मई यांनी सांगितलं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केंद्र सरकारकडे धरणाच्या उंची वाढीविरोधात तक्रार केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही जलशक्ती मंत्री पाटील आणि सोमण्णा यांच्यासोबत बैठक घेऊन महाराष्ट्राचा आक्षेप चुकीच्या उद्देशाने असल्याचे सांगितले.
कृष्णा जलवाटप न्यायाधीकरण-2 ने धरणाची उंची 524 मीटरपर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे. याआधी तिन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणी अहवालानुसार ही वाढविलेली उंची कोणताही पुराचा धोका निर्माण करणार नाही. 2005 साली आलेल्या पुराच्या वेळीही केंद्रीय जल आयोगाने सांगली आणि कोल्हापूरमधील पूर 'अलमट्टी' धरणामुळे नव्हता, असे स्पष्ट केले होते.
या भेटीनंतर कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील अलमट्टी धरण उंची वाढीचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणात केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जलशक्ती मंत्रालयाच्या परवानगीशिवाय धरणाची उंची वाढवणे शक्य नाही.
त्यामुळे कर्नाटककडून नवी दिल्लीत दबाव वाढवला जात आहे. कर्नाटकने हा प्रश्न आता राज्याच्या हक्काचा मुद्दा बनवला असून, पुढील काही आठवड्यांत यावर मोठा राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे. अलमट्टीची उंची वाढविण्याला होत असलेला विरोध योग्यच आहे. आम्ही आमची बाजू ठामपणे मांडली आहे.
कोल्हापूर आणि सांगलीला महापूर येणार नाही, हिप्परगी बंधारा या दोन्ही प्रश्नाबाबत महाराष्ट्र शासनाने जी बाजू मांडली ती न्यायाला धरूनच आहे. आम्ही आमचा पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.