
Solapur, 20 April : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील यांच्या पॅनेलने माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनेलचा धुव्वा उडवत २१-० असा पराभव केला. विधानसभा निवडणुकीनंतर पाटील यांनी शिंदे यांना दुसऱ्यांना धूळ चारली आहे. आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीतील यशाबाबत बोलताना नारायण पाटील यांनी बागल गटाने मदत केल्याचे जाहीरपणे बोलून दाखवले. तसेच भाजपच्या एका बड्या नेत्यानेही ‘हात’ दिल्याचे आमदार पाटील यांनी प्रथमच स्पष्ट केले.
आमदार नारायण पाटील (Narayan Patil) म्हणाले, श्री आदिनाथ सहकारी कारखाना हा माझे वडिल (स्व.) गोविंदबापू पाटील यांनी मोठ्या कष्टाने उभारला होता. माझ्या वडिलांनी २० ते २२ वर्षे पायात चप्पल न घालता कारखाना उभारणीसाठी कष्ट घेतले होते. काळाच्या ओघात माझ्या वडिलांना बाजूला करण्यात आले आणि तो कारखाना इतरांच्या ताब्यात गेला.
आदिनाथ कारखाना (Adinath Sugar Factory) व्यवस्थित चालण्याऐवजी गेली पाच ते सहा वर्षे डबघाईला आला होता. योग्य व्यवस्थापनाच्या अभावी कारखाना शेवटच्या घटका मोजत होता. निवडणूक जाहीर झाल्यानंतर मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी कारखान्याची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. बंद अवस्थेतील साखर कारखाना कोणीही चालवायला तयार नसताना मी ते आव्हान स्वीकारलेले आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.
ते म्हणाले, नारायण पाटील आदिनाथ सहकारी साखर कारखाना कसा चालविणार, निधी कोठून येणार, अशी चर्चा केली जाते. पण, माझ्यावर आलेली जबाबदारी मी आतापर्यंत लिलया पार पाडली आहे. पण मी पहिल्यांदा जेव्हा आमदार झालो, तेव्हा मी माझं कर्तृत्व सिद्ध केले आहे, त्यामुळे आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालविण्यास कोणतीही अडचणा येणार नाही.
ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सर्व नेते मला आदिनाथ सहकारी साखर कारखान्या निवडणुकीत मदत करतील. हे सर्व नेते हे लोकाभिमुख आहेत, त्यामुळे ते आदिनाथ कारखान्यसारख्या संस्थेला नक्कीच मदत करतील, असा विश्वास नारायण पाटील यांनी बोलून दाखवला.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील यशाचे श्रेय मी जनतेला देईन. तसेच, आम्हाला मदत करणारे माजी आमदार जयवंतराव जगताप, दिग्विजय बागल यांनीही आम्हाला या निवडणुकीत मदत केली आहे. तसेच, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजिसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही मदत केली. त्यामुळेच आम्हाला कारखान्याच्या निवडणुकीत एवढं मोठे यश मिळाले आहे.
विशेष म्हणजे भाजपचे बडे नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनीही आम्हाला मदत केली, या सर्वांच्या सहकार्यातूनच आम्ही आदिनाथ कारखाना जिंकू शकलो, असे सांगून त्यांनी बागल आणि शिंदे यांच्या मदतीबाबत प्रथमच भाष्य केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.