वडुज : पन्नास खोके... एकदम ओके....शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो... या सरकारचं करायचं काय... खाली मुंड्या वर पाय... अशा राज्यकर्त्यांच्या निषेधाच्या घोषणा देत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजेची हाक देत वडुज येथील तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे तोरण बांधले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी खटाव तालुक्यातील वडुज येथे हे आंदोलन केले. जिल्हाप्रमुख प्रताप जाधव, तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. प्रारंभी शिवसैनिकांनी निष्क्रीय राज्यकर्त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
त्यानंतर तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर नुकसानग्रस्त शेतीपिकांचे तोरण बांधले. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख प्रताप जाधव म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीपिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे.
खटाव तालुक्यांत अशी परिस्थिती असताना पालकमंत्री, मतदारसंघाचे खासदार तसेच या तालुक्यांचे आमदार निद्रीस्त झाले आहेत. पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेविरोधात शिवसैनिक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. पन्नास खोके.. एकदम ओके... करून हे लोकप्रतिनिधी सत्तेत आले आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसैनिक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरले आहेत. याबाबत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आगामी काळात व्यापक स्वरूपात आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला. यावेळी आंदोलकांच्यावतीने तहसिलदार किरण जमदाडे यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात माजी तालुकाप्रमुख युवराज पाटील, दिनेश देवकर,यशवंत जाधव, संतोष दुबळे, अमित कुलकर्णी, अमिन आगा, अजित पाटेकर, अजित देवकर, सलमा शेख, सुशांत पार्लेकर, आबासाहेब भोसले, चंद्रकांत फाळके सचिन करमारे, आप्पासाहेब खुडे, अभिजीत साळुंखे, शुभम गायकवाड, सोमनाथ खुडे, निखील राऊत, आदित्य राऊत, काका पवार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.