State Cooperative Bank Scam : ‘अण्णा, अजितदादांना बदनाम करण्याच्या मोहिमेचे कोणाचे तरी हत्यार बनू नका’

Umesh Patil Request To Anna Hazare : मला समजत नाही की, सगळे मिळून अजित पवारांच्या पाठीमागे का लागले आहेत? यांचा बोलवता धनी कोण आहे? या पाठीमागे जे कोणी आहेत, ते हे सर्व ठरवून करत आहेत.
Anna Hazare-Ajit Pawar-Umesh Patil
Anna Hazare-Ajit Pawar-Umesh PatilSarkarnama

Solapur, 14 June : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) गैरव्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लिन चीट देत न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. त्याला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विरोध करत निषेध याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘अण्णा, अजितदादांना बदनाम करण्याच्या मोहिमेचे कोणाचे तरी हत्यार होऊ नका, एवढीच तुम्हाला आमची विनंती आहे,’ असे पाटील यांनी म्हटले आहे.

उमेश पाटील (Umesh Patil) म्हणाले, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (State Cooperative Bank) गैरव्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सुनेत्रा पवार आणि संचालक मंडळांची वेगवेगळ्या स्तरावर चौकशी झाली आहे. पोलिस खाते, ईओडब्ल्यू, सीआयडी, सीबीआय, न्यायालयाच्या संदर्भाने जे आदेश असतील, त्या संदर्भानेही चौकशी झाली.

शिखर बॅंकेच्या गैरव्यवहार प्रकरणी आम्ही सत्तेत असताना आणि नसतानाही चौकशी झाली. यासंदर्भात चौकशी करणाऱ्या यंत्रणेला कुठलेही पुरावे आढळून आलेले नाहीत. बॅंकेत गैरव्यवहार झाल्याचा निष्कर्ष एकाही यंत्रणेने काढलेला नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केलेला आहे.

असं असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेल्या क्लीनचिटला विरोध करत न्यायालयात निषेध याचिका दाखल करत आहेत. मला समजत नाही की, सगळे मिळून अजित पवारांच्या पाठीमागे का लागले आहेत? यांचा बोलवता धनी कोण आहे? या पाठीमागे जे कोणी आहेत, ते हे सर्व ठरवून करत आहेत, असा संशयही पाटील यांनी व्यक्त केला.

अंजली दमानिया, अण्णा हजारे, मीरा बोरवणकर, जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात शालिनीताई पाटील या सर्व लोकांनी ठरवून फक्त अजितदादांना बदनाम करण्याचे षड्यंत्र कुणाच्यातरी सांगण्यावरून रचले आहे, असा आरोपही उमेश पाटील यांनी केला.

ते म्हणाले, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. त्यांच्यामुळे ‘माहिती अधिकार कायदा’ देशाला मिळाला. आदर्श गाव संकल्पनेचे ते जनक आहेत. मात्र, अजितदादांच्या संदर्भात त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर, त्यांना आम्ही भेटून तो दूर करू. त्यांना जी कागदपत्रे पाहिजे असतील ती दाखवू. विनाकारण अजितदादांना बदनाम करण्याच्या मोहिमेचे कोणाचे तरी हत्यार बनू नका, एवढीच आमची अण्णांना विनंती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com