

Solapur, 17 July : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका राजकीय पक्षाची एन्ट्री होणार असल्याचे निश्चित झाले आहे. तेलंगणात त्याबाबतची रणनीती ठरली असून लवकरच त्याबाबतची घोषणा होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतविभाजनाचा धोका निर्माण होऊ शकतो.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तथा प्रख्यात तेलुगू अभिनेता पवनकल्याण यांच्या जनसेना पक्षाची महाराष्ट्रात स्थापना करण्यासंदर्भात हैदराबाद येथील एका बैठकीत चर्चा झाली. त्यात महाराष्ट्रातील पक्षाच्या वाटचालीसंदर्भात घोषणा होणार आहे. सोलापुरातील कार्यकर्ते श्रीनिवास यन्नम (कामटे) यांनी ही माहिती दिली.
तेलंगणा राज्यातील जनसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक नुकतीच झाली. जनसेना पक्षाचे जनरल सेक्रेटरी राम तल्लूरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. तीत पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासह महाराष्ट्रात जनसेना पक्षाची स्थापना करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
बैठकीला सुधाकर मच्छा, आर. के. सागर आणि प्रेम गांधी यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सोलापूरहून जनसेना शाखेच्या वतीने श्रीनिवास बिटला, अनिल कोंडा, आनंद अवधूत, रोहन श्रीराम आणि श्रीनिवास यन्नम (कामटे) हे सहभागी झाले होते. त्यांनी महाराष्ट्रातील संघटनात्मक कामकाजाबाबत भाष्य केले.
बैठकीत जनसेना पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेल्या संघटनात्मक आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध जिल्ह्यांत पक्षबांधणी, नवे कार्यकर्ते पक्षासोबत जोडणे, युवकांचा सहभाग वाढविणे तसेच सामाजिक प्रश्नांवर जनतेशी थेट संवाद साधण्याबाबत विचारविनिमय झाला आहे. पक्षाचे जनरल सेक्रेटरी राम तल्लूरी यांनी महाराष्ट्रात जनसेना पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
सोलापूर शहरातून जनसेना पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला सुरुवात करण्यात येणार असून, त्याबाबतची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसांत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केल्याची माहितीश्रीनिवास यन्नम (कामटे) यांनी दिली.
महाराष्ट्रातील जनसेना कार्यकर्त्यांना संघटित करून पक्षाची मजबूत उभारणी करण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाकडून आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य मिळणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. आगामी काळात महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये बैठका, सदस्य नोंदणी अभियान आणि संघटनात्मक कार्यक्रम राबविण्याचाही प्राथमिक आराखडा या बैठकीत मांडण्यात आला.
या बैठकीमुळे महाराष्ट्रातील, विशेषतः सोलापूरमधील जनसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाच्या विस्ताराला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील जनसेना पक्षाच्या वाटचालीसाठी ही बैठक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.