Solapur, 04 August : अरण (ता. माढा, जि. सोलापूर) येथील संत सावता महाराज समाधी मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देण्यात येईल. तसेच, भक्तनिवासाचा जो आराखडा तयार करण्यात येत आहे, त्यासाठी लागणारा निधी आपण देऊच.
पण, आजच 100 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अरण येथे भक्त निवासाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आपल्या भाषणात श्री संत सावता महाराज समाधी मंदिराला तीर्थक्षेत्राचा अ दर्जा देण्याची मागणी केली होती. फडणवीस यांनी त्याची तत्काळ घोषणा करून टाकली.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमांनी महाराष्ट्राला पराक्रमाची भूमी बनविले. त्याचवेळी संतांनी महाराष्ट्राचा संतभूमी म्हणून गौरव केला. संतांनी आपल्याला जो विचार दिला, तो आजही शेकडो वर्षांनी काळाशी सुसंगत आहेत.
महाराष्ट्र भूमीवर परकीयांची अनेक आक्रमणं झाली. ही आक्रमणं संपत्तीवर नव्हती, तर ती आपली आस्था, धर्म, विचार आणि संस्कृतीवर होती. एवढ्या आक्रमणानंतर आपली संस्कृती जीवंत राहिली. कारण आपली संतांची परंपरा होती. या संतांच्या परंपरेनेच प्रत्येकी वेळी सामान्य माणसाला भक्तीमार्गावर नेलं. त्याला निराशेतून बाहेर काढलं. अन्याच्या विरोधात लढण्याचे बळ आपल्याला संतपरंपरेने दिले आहे, असे ही फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस म्हणाले, संत हे वेगवेळ्या जातीचे आणि समाजाचे होते. पण त्यांनी कधीही जातीपातीचा विचार केलेला नाही. संत सावता महाराजांचे (Savata Maharaj) अभंग काशीबा गुरवांनी लिहिले. संत तुकारामांची गाथा ज्यावेळी बुडविण्याचा प्रयत्न झाला. पण, ती पुन्हा समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम संताजी महाराज जगनाडे यांनी केले आहे.
आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता आज आम्हाला संतांची गरज आहे. जाती जातीमध्ये समाजात विभागला जात आहे. समाजामध्ये भेद निर्माण होत आहे. कधी कधी प्रश्न पडतो की, एवढी मोठी संतांची मांदियाळी असलेला हाच तो महाराष्ट्र आहे का. आज राजकीय क्षेत्रातील मोठमोठे नेते मूग गिळून बसले आहेत. मतांच्या राजकारणासाठी समाजातील दुही मान्य ठेवली तर आपल्याला वर्तमान असेल पण भविष्य नसेल, असे भाष्यही फडणवीसांनी सध्याच्या परिस्थितीवर केले.
ते म्हणाले, आज एकसंघ समाजाची गरज आहे. प्रत्येक समाजाचे प्रश्न आहेत, ते सोडवले गेले पाहिजेत. पण, हे करताना एक समाज दुसऱ्या समाजासमोर उभा आहे. कुठेतरी दरी पडली आहे. दुभंगलेला समाज आहे, हे सावता महाराजांनाही मान्य नव्हते. आपण संतांचा आणि पंढरपूरच्या वारीचा महिमा सांगत असू तर आपल्याला सर्व समाज एकसंघ करावा लागेल. आपण सर्वजण एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, तरच आपल्याला संतांशी नाते सांगता येईल.
भुजबळांच्या भाषणाचे फडणवीसांनी केले कौतुक
महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा बुलंद आवाज छगन भुजबळ असा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केला. आज अध्यात्मिक कार्यक्रम असल्यामुळे भुजबळ यांची वाणीसुद्धा आज एखाद्या संतासारखीच होती. त्यामुळे त्यांच्या भाषणातून अध्यात्म जास्त येत होते, त्यांचे नेहमीचे बाणी कमी सुटले, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.