सोलापूर : सोलापुरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला अवैध दारू विरोधी 'ऑपरेशन परिवर्तन' मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र या अंतर्गत करण्यात आलेल्या एका मोहिमेदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांवर मुळेगाव तांडा येथे जमावाने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. (Solapur Crime news)
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांना मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टी अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक याठिकाणी कारवाई करायला गेले असताना काही लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात या हल्ल्यात महिला पोलीस प्रियंका कुटे या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर मध्ये उपचार सुरु आहेत.
मात्र या कारवाईमध्ये एकूण 1480 लिटर हातभट्टी नष्ट करण्यात आली असून 32 लाख 43 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याचबरोबर या कारवाईमध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर मूळ हल्लाखोर फरार आहे. या सर्व आरोपींवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा भारतीय दंड संहिता कलम 353 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- तेजस्वी सातपुतेंचा महत्त्वकांक्षी प्रकल्प
सोलापूर जिल्ह्यातील हातभट्टी दारू पूर्णत: बंद व्हावी, यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या पुढाकारातून १ सप्टेंबर २०२१ रोजी ‘ऑपरेशन परिवर्तन’ हाती घेण्यात आले. या मोहिमेला साडेनऊ महिन्यांतच चांगला प्रतिसाद मिळू लागला. विशेष म्हणजे, तांड्यांवरील हातभट्टी गाळणाऱ्या कुटुंबांमधील तरूण व महिलांमध्ये परिवर्तन दिसून आले.
या मोहिमेंतर्गत प्रत्येक अधिकाऱ्यांना हातभट्टी गाळणारे तांडे, गावे व विक्री होणारी गावे दत्तक देण्यात आली होती. या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कारवाईतून, समुपदेशनातून आणि रोजगार मेळावे, पुनर्वसन व जनजागृतीच्या माध्यमातून तेथील नागरिकांमध्ये परिवर्तन घडवून आणले. त्यानंतर अनेक अवैधरित्या हातभट्टी गाळणारे हात शेती, मजुरी, मशीन ऑपरेटर, पशुपालक, खासगी कंपनीत नोकरी, दुकान व हॉटेल, विणकाम अशी कामे करताना दिसत आहेत.
अधिकाऱ्यांनी राबवलेल्या जनजागृतीच्या माध्यमातून साडेनऊ महिन्यातच २१५ लोकांनी हातभट्टीचा व्यवसाय सोडून दिला. तर ऑपरेशन परिर्वतन अंतर्गत पोलिसांनी सहाशेपेक्षा जास्त गुन्हे दाखल केले. त्यांचेही समुपदेशन करण्यात आले. त्याच काळात पोलिसांनी जवळपास सव्वाकोटींचा मुद्देमाल नष्ट केला. सोलापूरात सातत्याने कारवाई होत असल्यानेही अनेकांनी तो व्यवसाय सोडून समाजमान्य व्यवसायाची वाट धरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.