

Mangalvedha, 16 October : गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असलेला सोलापूर जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव अवताडे, त्यांच्या पत्नी मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा सुनंदा अवताडे यांच्या भाजप प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत उद्या (ता. १७ ऑक्टोबर) सोलापुरात पक्षप्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, अवताडे यांच्यासोबत मंगळवेढा नगरपालिकेचे ५ नगरसेवक, बाजार समिती सभापतींसह १७ सदस्य, खरेदी-विक्री संघाचे सभापती आणि १४ सदस्य, 10 गावचे सरपंच, 70 सोसायट्यांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य कमळ हाती घेणार आहेत.
अवताडे यांनी दहा महिन्यांपूर्वी भगीरथ भालके यांच्यासोबत युती करत भाजपच्या विरोधात मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, अवताडे यांनी भालके यांची सोबत सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवेढ्यात तीर्थक्षेत्र विकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानला जात आहे.
भाजपविरोधात निवडणूक लढवून अवताडे आणि भालकेंच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीने नगराध्यक्षांसह 9 जागा जिंकल्या होत्या. मात्र सत्ता स्थापन केल्यानंतर काही महिन्यांतच स्वीकृत नगरसेवक व पक्षनेता निवडीवरून तीर्थक्षेत्र विकास आघाडीत फूट पडली होती. पक्षनेता निवडीबाबत जिल्हाधिकाऱ्याला स्वतंत्रपणे पत्रव्यवहार करण्यात आला होता. आघाडीच्या काही नगरसेवकांनी स्वतंत्र बस्तान बसवले आहे.
दरम्यान, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे भगीरथ भालके, पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके यांच्यासह काही समर्थकांनी एप्रिल महिन्यातच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपुरात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा सुनंदा अवताडे, बबनराव अवताडे, समर्थक 5 नगरसेवक व इतर काही प्रमुख मंडळी त्या पक्षप्रवेशपासून अंतरावर होती. मात्र, नगरपालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळवणे, शहरातील विकास कामे आणि सध्याच्या भीषण दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी अवताडे आणि काही समर्थकांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
अवताडे गटाच्या भाजप प्रवेशाची गेल्या दोन महिन्यांपासून शहरात चर्चा होती. त्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून उद्या (ता. १७ ऑक्टोबर) सोलापुरात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश होणार आहे.
या वेळी जिल्हा बॅंकेचे माजी संचालक बबनराव अवताडे, नगराध्यक्षा सुनंदा अवताडे, ५ नगरसेवक, 10 गावचे सरपंच, 40 ग्रामपंचायत सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीसह १७ सदस्य, खरेदी-विक्री संघाच्या सभापतींसह १४ सदस्य. 70 सोसायट्यांचे पदाधिकारी उद्या कमळ हाती घेणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.