Pandharpur, 08 June : पंढरपूर तालुक्यातील 57 गावे ही माढा लोकसभा मतदार संघात येतात. त्यातील 42 गावे माढा, तर सांगोला विधानसभेला 15 गावे जोडण्यात आली आहेत. भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार बबनराव शिंदे, विठ्ठलचे अध्यक्ष अभिजीत पाटील, शरद पवार गटाचे गणेश पाटील, कल्याणराव काळे यांचे माढ्यातील 42 गावांत वर्चस्व आहे. मात्र, याच 42 गावांतून धैर्यशील मोहिते पाटील यांना 16 हजार 500 चे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे बड्या नेत्यांच्या बोलकिल्ल्यातच भाजपला धक्का बसला आहे. विशेषत अजित पवार गटाकडून निंबाळकरांना ठेंगा दाखवला गेल्याची चर्चा आहे.
महायुतीच्या पाच आमदारांसह राष्ट्रवादी काॅंग्रेस नेत्यांची माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Constituency) मजूबत ताकद होती. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil ) यांनी बाजी मारली आहे. मोहिते पाटलांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitshinh Naik Nimbalkar) यांचा 1 लाख 21 हजार मतांच्या फरकाने धुव्वा उडवला. माढा लोकसभा मतदार संघात पंढरपूर तालुक्यातील 57 गावांचा समावेश आहे. यापैकी 42 गावे माढा, तर 15 गावे सांगोला विधानसभा मतदार संघाला जोडली आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोणत्या तालुक्यातून आणि गावातून कोणाला किती मताधिक्य मिळाले, याची चर्चा निकालानंतर सुरु झाली आहे. पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे आणि राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या वाडीकुरोली गावातूनच महायुतीच्या उमेदवाराला मोठा धक्का बसला आहे. वाडीकुरोली या काळे बंधूच्या गावातून मोहिते पाटील यांना 170 मतांचे लीड मिळाले आहे. काळे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाळवणी गटातील 15 गावांत 4 हजार 596 मतांचे लीड मोहिते पाटील यांनी घेतले आहे.
माढा विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातील 42 गावांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना 16 हजार 500 चे मताधिक्य मिळाल्यामुळे आमदार बबनराव शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटी मानली जात आहे. काळे यांच्या वाडीकुरोली, पिराचीकुरोली या दोन गावांतूनही मोहिते पाटील यांनी माताधिक्य घेतले आहे.
मोहिते पाटील यांनी कल्याणराव काळे यांचा बोलकिल्ला असलेल्या भाळवणी गटातील 15 गावांतही 4 हजार 496 मतांचे लीड मिळविले आहे. ही 15 गावे सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडली आहेत. त्यामुळे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्यासाठी धक्कादायक मानले जात आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांना ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांचे भाळवणी, दीपक पवार यांचे जैनवाडी, विठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक विलास देठे यांच्या धोंडेवाडी या गावांत चांगले मताधिक्य मिळाले आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे यांच्या उपरी गावात निंबाळकर हे 350 मतांनी मागे आहेत.
पंढरपूर तालुक्यातील 52 गावे जी माढा आणि सांगोला विधानसभा मतदार संघाला जोडली होती. त्या गावांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पसंती दिली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे आणि शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांची धाकधूक वाढली आहे.
अभिजीत पाटलांच्या गावात निंबाळकरांना आघाडी
लोकसभा निवडणुकीच्या मध्यावर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. मात्र, त्यांच्या निर्णयाचाही भाजपला फायदा झाले नसल्याचे दिसून आले. मात्र पाटील यांच्या देगावमध्ये रणजितसिंह नााईक निंबाळकर यांना 132 मतं अधिक मिळाली आहेत.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.