Sahyadri Sugar Factory : 'ठोक आता शड्डू' : गुलाल उधळताच बाळासाहेबांच्या समर्थकांनी घोरपडेंना डिवचलं
Karad : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची बहुचर्चित निवडणूक जिंकत माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी त्यांची अनेक वर्षांपासूनची सत्ता कायम राखली. विरोधातील दोन्ही पॅनेलचा सुपडासाफ करत त्यांनी विधानसभा निवडणुकीतील वचपा काढला. पण यासोबतच विरोधकांनी निवडणुकीपूर्वी त्यांना शड्डू ठोकून दिलेले आव्हानही लीलया परतवून लावले.
गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा कराड उत्तर मतदारसंघातून पराभव झाला. भाजप नेते मनोज घोरपडे यांनी त्यांना आस्मान दाखवले. या निकालानंतर निघालेल्या मिरवणुकीत घोरपडे यांनी सह्याद्री कारखान्याकडे पाहून शड्डू ठोकल्याचा दावा पाटील यांनी केला. पण यातून सह्याद्रीही जिंकणारच असे घोरपडे यांनी बाळासाहेब पाटील आव्हान दिल्याचे बोलले गेले.
जवळपास 32 हजार सभासद असलेल्या सह्याद्री साखर कारखान्यावर मागील अनेक वर्षांपासून बाळासाहेब पाटील यांची एकहाती सत्ता आहे. बहुतांश निवडणुका बिनविरोध किंवा एकतर्फीच झाल्या. मात्र यावेळी विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे बाळासाहेब पाटील यांच्यासमोर सह्याद्री राखण्याचे आव्हान होते. अशात बाजार समिती पॅटर्न राबवून सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचे नियोजन केले होते.
एका प्रचारसभेदरम्यान, बाळासाहेब पाटील यांनी मनोज घोरपडे यांच्या शड्डूला प्रत्युत्तर दिले होते. निवडणुकीत हार-जीत होत असते, पण अशी प्रवृत्ती वाढू देणार नाही, कारखाना आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याकडे बघून शड्डू ठोकणाऱ्या विरोधकांना सभासदच जागा दाखवणार, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांचे हे बोल सभासदांनी खरे करत बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलला दणदणीत मताधिक्क्याने निवडून दिले. 21-0 असा विरोधातील दोन्ही पॅनेलचा सुपडा साफ केला.
त्यानंतर बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी विजयी मिरवणुकीत जल्लोष केला. पाटील यांना खांद्यावर घेत गुलालाची उधळण करत 'ठोक आता शड्डू' असे पोस्टर्स दाखवून भाजप आमदार मनोज घोरपडे आणि त्यांच्या समर्थकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. याला आता आगामी काळात मनोज घोरपडे कसे प्रत्युत्तर देणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.