

सातारा जिल्हा बँक आणि बाजार समितीच्या निवडणुकांमधील मतभेदानंतर दुरावलेले पाटील-उंडाळकर गट आता कऱ्हाड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकत्र येताना दिसत आहेत.
लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीच्या संयुक्त प्रचारात दोन्ही गटांचे नेते सहभागी झाल्याने स्थानिक राजकारणात महत्त्वाचे समीकरण बदलले आहे.
आघाड्यांच्या बॅनरवर ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे छायाचित्र दिसल्याने आणि रॅलीतही ते सहभागी झाल्याने भविष्यातही हे गट एकत्र राहतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Karad, 25 November : सातारा जिल्हा बॅंकेच्या सुमारे चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीने कऱ्हाड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली. त्यावेळी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांचे गट एकत्र आले होते, तर ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा गट पाटील यांच्यापासून दुरावला होता. मात्र, पालिका निवडणुकीसाठी पाटील-उंडाळकर गट एकत्र येताना दिसत आहेत.
लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतरच्या प्रचार फेरीत पालकमंत्री देसाई यांच्याबरोबर माजी मंत्री बाळासाहेब पाटील (Balasheb Patil), यशवंत विकास आघाडीचे राजेंद्र यादव उपस्थित होते. शहरातील चावडी चौकात ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकरही त्यांच्यासोबत प्रचार रॅलीत सहभागी झाले. त्यामुळे पाटील-उंडाळकर गट एकत्र येण्यासाठी कऱ्हाड नगरपालिका निवडणूक निमित्त ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कऱ्हाड तालुक्याच्या राजकारणात माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर आणि ज्येष्ठ नेते (कै.) पी. डी. पाटील यांनी एकमेकांना अनेकदा साथ देत दबदबा कायम ठेवला. कऱ्हाड (Karad) पंचायत समितीवरही या दोन्ही गटांचीच सत्ता होती. सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक चार वर्षांपूर्वी झाली. सोसायटी गटातून अनेक वर्षे माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांनी प्रतिनिधित्व केले.
विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यांतर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत ॲड. उदयसिंह पाटील यांनी सोसायटी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचवेळी जिल्ह्यात राष्ट्रवादी सक्षम असल्याने माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना सोसायटी गटातून उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे माजी मंत्री पाटील आणि ॲड. उंडाळकर यांच्यात लढत झाली.
माजी मंत्री पाटील यांना भाजपचे डॉ. अतुल भोसलेंनी साथ दिली, तर माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासोबत असणाऱ्या ॲड. उंडाळकर यांच्यासाठी चव्हाण यांनीही या निवडणुकीत थेट भाग घेतला नाही. ॲड. उंडाळकर यांच्या विरोधात लढत देऊन माजी मंत्री पाटील यांनी निवडणूक जिंकली. त्यावेळपासून उंडाळकर गट हा पाटील गटापासून दुरावला गेला होता.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीमुळे कऱ्हाड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली. त्यादरम्यान झालेल्या बाजार समिती निवडणुकीतही भोसले-पाटील यांनी उंडाळकर गटाविरोधात पॅनेल उभे केले. त्यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी फिल्डवर उतरून ॲड. उंडाळकरांना साथ दिली.
बाजार समिती निवडणुकीत ॲड. उंडाळकर यांना यश मिळाले. मात्र, त्यामुळे पाटील-उंडाळकर गटातील दरी खूपच वाढली. त्यानंतर विधानसभेलाही तेच समीकरण राहिले. त्यामुळे भविष्यात पाटील-उंडाळकर गट लवकर एकत्र येईल, अशी शक्यताच नव्हती. मात्र, पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बऱ्याच कालावधीनंतर पाटील-उंडाळकर गटाचे समीकरण जुळून येत असल्याचे चित्रआहे.
पालिका निवडणुकीपूर्वी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री चव्हाण, माजी मंत्री पाटील, यशवंत विकास आघाडीचे प्रमुख राजेंद्र यादव यांचे समर्थक असलेल्या माजी नगरसेवकांना भाजपवासी केले. आमदार डॉ. भोसले यांच्या या कृतीमुळे माजी मंत्री पाटील आणि यशवंत विकास आघाडीचे नेते यादव हे एकत्र आले. त्यांनी भाजपविरोधात लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येऊन आव्हान उभे केले आहे.
या आघाड्यांच्या एकत्रित प्रचाराचा प्रारंभ येथील दत्त चौकात पालकमंत्री देसाई यांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांनी शहरातून प्रचार फेरी काढली. त्यात पालकमंत्री देसाई, माजी मंत्री पाटील, यशवंत विकास आघाडीचे राजेंद्र यादव, विजय यादव यांच्यासह सर्व नेते, कार्यकर्ते, उमेदवार सहभागी झाले.
रॅली शहरातील चावडी चौकात गेल्यावर उघड्या जीपमध्ये असलेल्या पालकमंत्री, माजी मंत्री, यादव यांच्यासमवेत ॲड. उदयसिंह पाटीलही सहभागी झाले. अनेक वर्षांनंतर पाटील यांच्यासोबत ॲड. उंडाळकर हे प्रथमच एकत्र आले. पालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेले पाटील-उंडाळकर हे आगामी निवडणुकीसाठीही एकत्रच राहतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आघाड्यांच्या बॅनरवर ॲड. उंडाळकर
कऱ्हाड पालिका निवडणुकीसाठी भाजपविरोधात लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी एकत्र आली आहे. या दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत लावलेल्या बॅनरवर माजी मंत्री पाटील यांच्या व यशवंत आघाडीच्या बॅनरवर पहिल्यांदाच ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे छायाचित्र लावले होते. त्याची विचारणा दोन्ही आघाडीच्या नेत्यांना केल्यावर त्यांनी आम्ही समविचारींना बरोबर घेऊन निवडणूक लढवत आहोत, अशी टिपणी केली. मात्र, दोन्ही आघाड्यांच्या बॅनरवरील उंडाळकरांच्या छायाचित्रामुळे पाटील-उंडाळकर गट एकत्र येत असल्याबाबत राजकीय चर्चा होती. त्याचे प्रत्यंतर आघाड्यांच्या प्रचार रॅलीत आले.
प्र. पाटील-उंडाळकर गट पुन्हा एकत्र का आला?
उ: कऱ्हाड नगरपालिका निवडणुकीत भाजपविरोधी आघाडी मजबूत करण्यासाठी दोन्ही गट एकत्र आले.
प्र. मतभेद कधी निर्माण झाले होते?
उ: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत झालेल्या थेट लढतीनंतर दोन्ही गटांमध्ये दरी निर्माण झाली.
प्र. आघाड्यांच्या प्रचारात कोणते प्रमुख नेते सहभागी होते?
उ: पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, राजेंद्र यादव आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर.
प्र. पाटील-उंडाळकर एकत्रिकरणाचे महत्व काय?
उ: कऱ्हाड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची आणि आगामी निवडणुकांवर प्रभाव टाकण्याची शक्यता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.